काही दिवसांपूर्वीच देशात केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. परीक्षेचा निकाल जाहीर होताच विविध यशस्वी उमेदवारांच्या यशोगाथा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या चर्चेमध्ये तळागाळातून परीक्षेत अव्वल आलेल्या एका व्यक्तीची कहाणी मात्र रोमांचक आहे. उत्तर प्रदेशातील रिंकू राहीने यूपीएससी परीक्षेत ६८५ यशस्वी उमेदवारांपैकी ६८३ वा क्रमांक पटकावला आहे. मात्र, यावेळी परीक्षेतील टॉपर्सपेक्षा त्याच्या कथेचीच जास्त चर्चा आहे. काय घडले होते त्याच्या आयुष्यात?
रिंकू सिंग राही हा एक पीसीएस अधिकारी असून तो उत्तर प्रदेशचा आहे. त्याने २००४ साली पीसीएस परीक्षा उत्तीर्ण करून तो यूपी सरकारमध्ये समाज कल्याण अधिकारी म्हणून रुजू झाला. त्याच्या वडिलांची पिठाची गिरणी असून त्यावर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असे. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याचे संपूर्ण शिक्षण सरकारी शाळेतून झाले. त्याला शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर टाटा इन्स्टिट्यूटमधून बीटेकचे शिक्षण घेतले आणि पीसीएस परीक्षेत यश मिळवले.
२००८ च्या सुमारास रिंकूची मुझफ्फरनगर जिल्ह्यात समाजकल्याण अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. अधिकारी म्हणून काम करत असताना जिल्ह्यात शिष्यवृत्ती व फी प्रतिपूर्तीच्या नावाखाली सुरू असलेला घोटाळा त्यांच्या समोर आला. त्यांनी या प्रकरणाचा तपास करून घोटाळ्याचे पुरावे सादर केले. मात्र, या तपासादरम्यान तो स्थानिक माफियांच्या नजरेसमोर आला. त्याने उघडकीस आणलेला हा घोटाळा १०० कोटींचा होता. घोटाळा उघडकीस आल्याने त्याच्यावर माफियांनी हल्ला केला. या हल्ल्यात माफियांनी त्याच्यावर सात गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी त्यांच्या चेहऱ्यालाही लागली. त्यामुळे त्याचा चेहरा खराब झाला होता. शासकीय निवासी वसाहतीत बॅडमिंटन खेळत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला होता. या प्रकरणात न्यायालयाने चार आरोपींना दहा वर्षांची शिक्षा सुनावली होती.
अनेक महिन्यांच्या उपचारानंतर आणि तोंडाच्या शस्त्रक्रियेनंतर तो बरा झाला. पण त्यांचा त्रास इथेच संपला नाही. आरटीआय अंतर्गत विभागाकडून माहिती न मिळाल्याने २०१२ मध्ये त्यांनी लखनौ संचालनालयाबाहेर उपोषण केले. यावेळी राज्यात समाजवादी पक्षाचे सरकार होते. पुन्हा रिंकू गैरव्यवहाराबद्दल लढत होता म्हणून पुन्हा त्याला लखनऊच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. तो व्यवस्थेसाठी नाही तर व्यवस्थाच त्याच्याशी लढत होती. वेड्यांच्या रुग्णालयात पाठवण्यात आलेल्या रिंकूवर प्राणघातक हल्ला बसपा सरकारच्या काळात झाला होता.
हे ही वाचा:
हिंदू महासभेचे प्रवक्ते प्रमोद पंडित जोशींचे निधन
ईडीच्या चौकशीआधी सोनिया गांधी यांना कोरोना
जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये स्फोट, तीन जवान जखमी
गोव्यात तरुण पर्यटकांना घरात कोंबून मारहाण
या घटनेमुळे रिंकूच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि त्याने यूपीएससीची तयारी सुरु केली. सततच्या संघर्षामुळे हार न मानता रिंकूने २०२१ च्या नागरी परीक्षेत यश मिळवले आहे . सध्या ते हापूरमध्ये समाजकल्याण अधिकारी आहेत. याशिवाय, त्यांची राज्य सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या IAS-PCS कोचिंगच्या संचालकपदीही नियुक्ती करण्यात आली आहे.