अखेरचा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला, भारताचा मालिकाविजय

दक्षिण आफ्रिकेच्या रिली रॉसोला सामनावीर किताब

अखेरचा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला, भारताचा मालिकाविजय

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात भारताला ४९ धावांनी हार मानावी लागली. मात्र त्याआधीचे दोन्ही सामने भारताने जिंकले असल्यामुळे ही मालिका २-१ अशी भारताने खिशात घातली.

अखेरच्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद २२७ धावा २० षटकांत केल्या. त्याला उत्तर देताना भारताची मात्र दमछाक झाली.

दक्षिण आफ्रिकेच्या रिली रॉसोने अवघ्या ४८ चेंडूत १०० धावांची नाबाद खेळी करत आपल्या संघाला दोनशेचा टप्पा ओलांडून दिला. त्याला सलामीवीर क्विन्टन डीकॉकची छान साथ लाभली. डीकॉकने ६९ धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेच्या या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना भारतीय फलंदाजांची मात्र चांगलीच दमछाक झाली. सलामीवीर रोहित शर्मा तर भोपळाही न फोडता माघारी परतला. रबाडाने त्याला बाद केले. त्यानंतर ऋषभ पंतने २७ धावांची खेळी केली पण श्रेयस अय्यर अवघी १ धावा काढून माघारी परतला. दिनेश कार्तिकने ४६ धावा केल्या. कार्तिकएवढी धावसंख्या अन्य कोणत्याही भारतीय फलंदाजाला करता आली नाही. दीपक चहरने ३१ तर उमेश यादवने २० धावा केल्या. भारताचा डाव १८.३ षटकांत १७८ धावांतच आटोपला.

हे ही वाचा:

गुंतवणूकदारांनी लुटले तेजीचे सोने

एकनाथ शिंदे यांच्या तिसऱ्या टिझरमध्ये ‘दहातोंडी रावण’

कोंबडी आणि दारूवाटप करून राष्ट्रीय ‘पार्टी’ची घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात सरस्वती देवी पूजन

 

दक्षिण आफ्रिकेच्या ड्वेन प्रिटोरियसने ३ तर केशव महाराज, लुंगी एनगिडी, वेन पार्नेल यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून रिली रॉसो याची निवड झाली. त्याने आपल्या या शतकी खेळीत ७ चौकार आणि ८ खणखणीत षटकार लगावले.

या मालिकेतील पहिल्या दोन लढती जिंकून भारताने २-० अशी आघाडी घेतली होती. त्यामुळे मालिकाही भारताच्या खिशात गेली होती. मात्र अखेरचा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने प्रतिष्ठा राखली.

स्कोअरबोर्ड

दक्षिण आफ्रिका ३ बाद २२७ (रिली रॉसो १००, क्विन्टन डीकॉक ६८) विजयी वि. भारत सर्वबाद १७८ (दिनेश कार्तिक ४६, दीपक चहर ३१, ड्वेन प्रिटोरियस २६-३)

 

Exit mobile version