वाया गेलेल्या टायरपासून चपलांची निर्मीती करण्याचा अनोखा उपक्रम पुण्यातील पूजा बदामीकर यांनी सुरू केला आहे. त्यामुळे कित्येक वाया गेलेल्या टायरचा पुनर्वापर होण्यास सुरूवात झाली आहे.
बदामीकर यांनी बोलताना सांगितले की, “जगात प्रत्येक वर्षी एक बिलियन टायर फेकून दिले जातात. त्यामुळे मी स्थानिक चर्मकार समाजाशी बोलायला सुरूवात केली आणि माझ्या या प्रवासाला सुरूवात झाली.”
‘निमीताल’ या ब्रँडमार्फत गेली दोन वर्षे टायरचा पुनर्वापर करून चपला बनविणाऱ्या बदामीकर यांनी पारंपारिक ऊर्जास्त्रोतांत पदवी-उत्तर पदवी घेतली आहे.
‘ए.एन.आय’शी बोलताना बदामीकर यांनी सांगितले की, “जगभरात आपण दरवर्षी १ बिलीयन टायरचा कचरा तयार करतो. या टायरचा रोजच्या वापरासाठी कसा वापर करता येईल यावर मी विचार करत होते, आणि शेवटी मला चपलांच्या रुपाने उत्तर मिळाले.”
या उद्योगासाठी २०१८ मध्ये बदामीकर यांनी आय.टी कंपनीतील नोकरी सोडली होती. त्याच वर्षी त्यांना ‘अपकमिंग वुमन आंत्रप्रिनिओर’ हा स्टार्ट- अप इंडिया स्पर्धेतला पुरस्कार प्राप्त झाला. बदामीकर यांच्या सांगण्यानुसार टायरचा पुनर्वापर केल्याने पर्यावरणाला अनेक तऱ्हेचा फायदा होतो.
“पारंपारिक पध्दतीने बनणाऱ्या चपलांसाठी वर्जन रबर अथवा प्लास्टिकचा वापर करून सोल बनवला जातो. त्या ऐवजी पुनर्वापर केलेल्या टायरचा वापर केल्यामुळे तिहेरी फायदा होतो. टायरच्या तळव्यांमुळे भूमी-भरण केंद्रांवर येणारा ताण कमी होतो. त्याचबरोबर बाजारात येणारे प्लास्टिक कमी केले गेले आहे. प्लास्टिक आणि वर्जन रबर बनविण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची देखील बचत होते.” असे बदामीकर यांनी सांगितले.