का दुःखी आहेत एसटीचे सेवानिवृत्त कर्मचारी?

का दुःखी आहेत एसटीचे सेवानिवृत्त कर्मचारी?

संपूर्ण आयुष्य तुटपुंज्या पगारात एसटी महामंडळाच्या सेवेत झिजवल्यानंतर सुद्धा महामंडळाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना हक्काच्या पैशासाठी आगारात चकरा माराव्या लागत आहेत. गेल्या अडीच वर्षात तब्बल सहा हजार कर्मचारी निवृत्त झाले आहेत. यामधील ४०० निवृत्त कर्मचारी मृत पावले आहेत.

अजूनही या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे दोन वर्षापासून १५० कोटी रुपये एसटी महामंडळाकडे थकीत आहेत. आशिया खंडातील सर्वाधिक मोठ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये एसटी महामंडळ गणली जाते. तरीही २०१९ पासून ५ हजार कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतरचे रजेचे पैसे व वेतनवाढ फरक मिळालेला नाही.

राज्यामध्ये अदमासे १ लाखांच्या आसपास एसटीचे कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, २०१९ पासून तब्बल राज्यभरातील ५ हजार निवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पैसे अद्यापही महामंडळाकडून मिळालेले नाही. त्यामुळेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे दीडशे कोटी रुपये देणे थकीत आहे.

एसटी महामंडळात निवृत्त झालेले कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतरचे रजेचे पैसे व वेतनवाढ फरकाचे पैसे महामंडळाकडून दिले जाते. अनेक कर्मचारी आपल्या हक्काचे पैसे मिळविण्यासाठी एसटी महामंडळाच्या मुख्यालयात गेल्या दोन वर्षापासून चकरा मारत आहे. मात्र, आतापर्यंत त्यांच्या हक्काचे पैसे मिळालेले नाही. त्यामुळे एसटी कामगार संघटनेकडून सुद्धा एसटी महामंडळाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा:

रिझर्व्ह बँकेची आता ‘या’ बँकवर मोठी कारवाई

‘शिवसेनेकडूनच शिवाजी महाराजांचे नाव देण्यास टाळाटाळ’

लाज वाटली पाहिजे या मंत्र्याला आणि ठाकरे सरकारला

पुरग्रस्त वाऱ्यावर, सरकार खूर्ची बचाव कार्यात व्यस्त

मुंबई येथील मुख्यालयात काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना सदरची रक्कम मिळालेली आहे. मात्र आगारात काम करून निवृत्त झालेल्या चालक- वाहक यांत्रिक कर्मचारी यांना पैसे दिलेले नाहीत. एसटी महामंडळातील निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांची थकीत देणी तात्काळ व्याजासह मिळावी याकरता एसटी महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे पाठपुरावा केला. परंतु ठाकरे सरकारकडून केवळ आश्वासने देण्यात येत आहेत.

निवृत्त कर्मचाऱ्यांची २०१८ पर्यंत देणी दिली आहेत. त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी व भविष्य निर्वाह निधीची रक्कम दिली आहे. उर्वरित देणी बाकी असून तीही लवकर देऊ, असे शेखर चन्ने व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

Exit mobile version