पानिपतानंतर पुन्हा दिल्लीवर भगवा !
दि. १४ जानेवारी १७६१ हा दिवस मराठ्यांच्या इतिहासात लाल शाईने कोरला गेला आहे. या दिवशी पानिपतचा तिसरा प्रचंड रणसंग्राम झाला, अन केवळ दैव बलवत्तर म्हणून अहमदशाह अब्दालीचा यात जय झाला. याला आज अनेक आधार उपलब्ध आहेत. सदाशिवरावभाऊ उत्तरेत जाताना अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने झाल्या वगैरे अनेक प्रवाद आपल्याकडे ज्ञात आहेत. आज त्यात खोलात जाण्यास काही कारण नाही. पण प्रत्यक्ष पानिपतावर, युद्धाच्या दिवशी दुपारपर्यंत मराठ्यांचं पारडं जड होतं हे जवळपास सगळ्याच साधनांतून स्पष्ट होतं. युद्धाच्या दिवशी देखील मराठ्यांचा जोर पाहून अहमदशाह अब्दालीने रणांगणातून काढता पाय घेण्याची तयारी चालवलेली. पण, अचानक विश्वासरावांना गोळी लागली, भाऊंचा राग अनावर झाला, दोघेही दिसेनासे झाल्याने ते मारले गेले असं वाटून फौज फुटली अन युद्धाचं पारडं फिरलं. पानिपतच्या युद्ध दिवसाच्या जवळपास दोन आठवडे आधीच वीस हजार फौजेसह नानासाहेब पेशवे उत्तरेच्या मार्गाला लागले होते, पण वाटेत भेलशाच्या मुक्कामी त्यांना बातमी समजली. खुद्द पेशव्यांची तब्येत बरी नसल्याने, त्यात राघोबादादा आणि मल्हारराव होळकर प्रभुतींनी पुढे जाण्यास ही वेळ योग्य नाही म्हटल्याने नानासाहेबांनी भेलशाहून पुढील सूत्र हलवली, आणि पुढे सहा महिन्यांच्या आत, दि. ३ जून १७६१ रोजी काळाने त्यांच्यावरही घाला घातला.
पानिपतच्या युद्धाने अपरिमित हानी झाली. खुद्द पेशवे घराण्यातील भावी पेशवा विश्वासराव, सदाशिवरावभाऊ, आणि पाठोपाठ नानासाहेब गेले. पानिपत मोहिमेला तोंड फुटलं तेव्हा ईश्वराघरचे शिपाई म्हणून नावाजलेले दत्ताजी शिंदे मारले गेले. पानिपतच्या युद्धात पकडले गेलेले वीर जनकोजी शिंदे यांचा अब्दालीच्या छावणीतच खून झाला. सैन्याची मोठी फळी एकतर कापली गेली अथवा अब्दालीच्या छावणीत गुलाम म्हणून पडली. एका बाजूला अब्दाली आणि मराठे यांच्यात हा भयंकर प्रकार सुरु होता तर दुसरीकडे हिंदुस्थानच्या भूमीवर गोऱ्या टोपीकरांचा भाग्योदय होण्याची चिन्ह दिसू लागली होती. अर्काट आणि प्लासीच्या विजयाने त्यांची महत्वाकांक्षा उफाळून आली. पानिपतात मराठी सत्ता संपली, आता रॉबर्ट क्लाइव्हच्या हुशारीने मोंगल बादशाह सुद्धा कायमचं इंग्रजांच्या हातचं बाहुलं होऊन राहणार अशी चिन्ह दिसू लागली. क्लाइव्हने उघडउघड मोंगलांकडून दिवाणीच पत्करली.
नानासाहेब गेले अन इकडे पुण्यात कलीने प्रवेश केला. पेशवेपदी बसण्याची राघोबादादांची इच्छा अनावर होऊ लागली. थोरल्या शाहू महाराजांच्या मृत्यूसमयी त्यांनी नानासाहेबांच्या वंशजांना परंपरागत पेशवाई देण्याची याद लिहून दिली होती, आणि तीच महाराजांची इच्छा असल्याने नानासाहेबांचाच कोणी पुत्र पेशवाईवर येणार हे उघड होतं. विश्वासराव मारले गेले तरी हयात थोरले पुत्र माधवराव यांना पेशवाई मिळणार हे उघड होतं, पण सरळमार्गी चालेल ते आयुष्य कसलं. राघोबादादांनी पेशवाई आपल्याला मिळावी म्हणून फासे फेकले आणि नव्या राजकारणाला आरंभ झाला. पुढची जवळपास सात-आठ वर्षे हे राजकारण रंगलं होतं. हे गट केवळ पेशवे घराण्यात पडले होते असं नव्हे, तर पराक्रमी शिंदे-होळकरादी घराण्यांमध्ये सुद्धा वारसाहक्कावरून वाद सुरु झाले होते. त्यातल्या त्यात सुख म्हणजे अहमदशाह अब्दालीने पानिपतच्या युद्धानंतर नानासाहेब पेशव्यांना पत्रं लिहून, अन पुण्याला गुलजार नावाच्या वकिलाला पाठवून “आमची लढायची इच्छा नव्हती, तुमच्या भावानेच हट्ट केल्याने लढावं लागलं. किमान आता तरी वैर विसरू. तुम्ही उत्तरेतली जी व्यवस्था कायम लावली होती तीच मी कायम ठेऊन जात आहे” असं कळवलं.
अहमदशाह अब्दालीने हे सांगितलं तरी संकट टळलं नव्हतं. पानिपतचं मूळ कारण अहमदशाह अब्दाली कधीही नव्हता. त्याचं मूळ होता नजीबखान रोहिला. गंगेच्या पूर्वेकडील प्रदेशात आणि अंतर्वेदीत आपला जम बसवून, उत्तरेकडील राजकारणातून मराठ्यांना कायमचं काढून देऊन आपण मुख्याधिकारी व्हावं ही मनीषा असलेला नजीबखान पानिपतच्या आधीपासूनच खोड्या काढायला लागला होता. अहमदशाह अब्दालीला पुन्हा पुन्हा हिंदुस्थानात घेऊन येण्याचा विचार त्याचाच. पानिपतच्या तिसऱ्या युद्धाआधी अहमदशाह अब्दाली तह करायला तयार असता त्याच्या सैन्यातील लोकांना धर्मयुद्धाच्या नावाखाली चिथावणी देणारा हाच नजीबखान. जोपर्यंत नजीब आणि त्याची पिलावळ जिवंत होती तोपर्यंत उत्तर सुरक्षित नव्हती. पण दुर्दैवाने, नानासाहेब गेल्यानंतर दक्षिणेत अंतर्गत राजकारणं उफाळून आल्याने माधवरावांना उत्तरेकडे बघण्यास तितकासा वेळ मिळला नाही. मध्यंतरी, १७६३ मध्ये निजामाने पुण्यावर हल्ला चढवला त्या प्रसंगापासून नानासाहेबांच्या या पुत्राची कर्तबगारी साऱ्या हिंदुस्थानला दिसून आली. राक्षसभुवनच्या प्रसंगात निजामाचा वजीर विठ्ठल सुंदर मारला गेला आणि त्यापुढे निजामाने जवळपास तीस-बत्तीस वर्षे डोकं वर काढलं नाही यातच माधवरावांनी त्याला काय तडाखा दिला असेल हे दिसून येतं. इकडे मल्हारराव होळकर गेल्यावर अहिल्याबाई होळकरांना आणि शिंदे घराण्यात महादजींना सरदारी देऊन माधवरावांनी उत्तरेत पुन्हा मराठ्यांचं बस्तान बसवण्यास हळूहळू सुरुवात केली. महादजी केवळ दैव बलवत्तर म्हणून पानिपतातून सहीसलामत येऊ शकले होते. त्यांचा पाय कायमचा अधू झाला होता.
इ.स. १७६८ मध्ये धोडपच्या लढाईनंतर माधवरावांनी राघोबादादा तसेच्या त्यांच्या कारभाऱ्यांना आपल्या जरबेत आणल्यानंतर माधवरावांची नजर उत्तरेकडे पुन्हा वळली. मध्यंतरी रघुनाथराव आणि मल्हारराव होळकरांनी इंग्रजाच्या विरुद्ध मोहिमा काढण्याचे अयशस्वी प्रयत्न केले पण इंग्रजांच्या रेट्यापुढे काही चाललं नाही. आता उत्तर हिंदच्या मोहिमेला पुन्हा तोंड फुटलं. पानिपतचा वचपा काढायचा, हिंदुस्थानात मराठे हेच जबरदस्त असून परकियांपासून मोंगलांचं संरक्षण करण्यास केवळ तेच आहेत हे दाखवणं हा यामागचा मुख्य उद्देश होता. पण त्याही पुढे जाऊन नजीबखानाला संपवणं हा सर्वात मोठा हेतू !
इ.स. १७६९ च्या उन्हाळ्यात रामचंद्र गणेश कानडे यांना मुखत्यारी देऊन, त्यांच्या हाताखाली विसाजी कृष्ण बिनीवाल्यांना देऊन उत्तरेत फौजा गेल्या. उदेपुराकडे असलेले महादजी शिंदे आणि तुकोजी होळकर हे या मुख्य फौजेला येऊन सामील झाले. जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर हजार मराठ्यांची फौज पाहून उत्तरेतल्या साऱ्या लहान मोठ्या संस्थानिकांची गाळण उडाली. उत्तरेत जाताच पहिलं काम हातावेगळं करावं लागलं ते म्हणजे भरतपूरच्या जाटांचा पराभव. दि. ५ एप्रिल १७७० रोजी मराठी फौजा कुंभेरीवर चालून गेल्या आणि समरु वगैरे युरोपिअन सेनानींचाही त्यांनी धुव्वा उडवला. तत्पूर्वी नजीबखानाने वेगळंच प्रकरण आरंभलं. पानिपतानंतर पुन्हा पाऊण लाख मराठे उत्तरेत का येत आहेत हे समजायला त्याला वेळ लागला नाही. त्याने तुकोजी होळकरांकडे संधान बांधून आपला जीव वाचवण्यासाठी फासे फेकले होते. कानडे आणि होळकरांनी नजीबखानाच्या मदतीने अंतर्वेदीत अंमल बसवता येईल अशा हेतूने त्याला अभय दिलं. पण ज्या नजिबामुळे आपला भाऊ दत्ताजी, पुतण्या, भाऊसाहेब, विश्वासराव आणि हजारो मराठे मारले गेले त्या नजीबला अभय देणे महादजींनी पटले नाही. ते रुसून मारवाडात निघून गेले. पुढे बिनीवाल्यांच्या साहाय्याने कानड्यांनी महादजींना परत बोलावलं आणि मथुरा जिंकून मराठे अंतर्वेदीत उतरले. हे होतं न होतं तोच नजीबखान अचानक मृत्यू पावला. त्याचा मुलगा झबेताखान मराठ्यांकडे ओलीस असता तोही तुकोजी होळकरांच्या सहाय्याने छावणीबाहेर जाण्यात यशस्वी झाला. या सगळ्या तिकडच्या राजकारणात इकडे माधवरावांना साऱ्या बातम्या समजत होत्याच. पेशव्यांनी एक खरमरीत पत्रं लिहून अंतर्गत धुसफूस थांबवून मोहिमेवर लक्ष केंद्रित करा हे सांगतानाच उत्तरेचं सारं चित्रच समोर उभं केलं. माधवरावांचं हे पत्रं विस्तारभयास्तव येथे देता येणे अशक्य आहे. जिज्ञासूंनी ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड ७, लेखांक ९ पहावा. माधवराव जरबेने म्हणतात, “तुम्हांस सर्व खोलून लिहिले आहे. याउपरी न कराल तर ठीक नाही. खुलासा, सर्वांनी येक येकाचे न्यून पाहून घाण केली तैसे न करणे. मातबर सरदारांनी सरकारचे लक्ष सोडून धणियाचे कामाची पायमल्ली केली. आपले वडिलांची रीत सोडून अमर्यादेस गोष्ट नेली यात कल्याण नाही. त्याही अशा गोष्टी सहसा नच कराव्या. धण्याचे लक्ष, धण्याचे हित तेच त्यांनी करावे, करून दाखवावे यात उत्तम नक्ष लौकिक होईल”. दि. २१ डिसेंबर १७७०च्या या पत्राने चारही सरदार पेटून उठले.
इकडे मराठ्यांची ही चढाई पाहून अलाहाबादेला असलेल्या बादशाह आणि शुजाउद्दौल्याला हायसं वाटलं. झाबेताखानाच्या माणसांकडे यावेळी दिल्ली असल्याने बिनीवाले-शिंदे-होळकरांच्या फौजा दिल्लीत शिरल्या. महादजींनी दिल्लीत शाहआलम बादशहाची द्वाही फिरवून दिल्लीच्या किल्ल्याचा ताबा मागितला. झाबेताची एक बेगम दिल्लीच्या किल्ल्यात होती. तिने किल्ला द्यायला नकार दिला तेव्हा दि. ७ फेब्रुवारी १७७१ रोजी महादजींचा तोफखाना लाल किल्ल्यावर आग ओकू लागला. पुढचे केवळ दोन दिवस मोंगलांची ही राजधानी लढली, अन तिसऱ्या दिवशी मराठ्यांच्या समोर शरण आली. दि. १० फेब्रुवारी १७७१ रोजी महादजी लाल किल्ल्यात शिरले. किल्ल्यावर भगवा ध्वज फडकू लागला. मिरजकर पटवर्धनांच्या एका पत्रात म्हटलंय, “सरकारचे झेंडे दिल्लीस उभे केले. तिकडे फौजेचा नक्ष मोठा झाला”.
एकंदरीतच, पानिपतनंतर बरोबर दहा वर्षातच मराठे पुन्हा उत्तरेत स्थिरावले. इतकंच नव्हे तर दिल्ली पुन्हा आपल्या छत्राखाली आणून बादशहाला आपल्या उपकारात पुन्हा तख्त बहाल केलं. पुढे आणखी सहा महिन्यात फौजा नजिबाच्या पथ्थरगडावर चालून गेल्या आणि नजिबाची राजधानी उध्वस्त केली वगैरे अनेक रोचक गोष्टी आहेत. पण दि. १० फेब्रुवारी हा दिवस मात्र इतिहासात “पानिपतचा प्रतिशोध” घेण्याचा उद्देश सफल झाला म्हणून कायमच ठळक अक्षरात नोंदला जाईल एवढं मात्रं नक्की.
– कौस्तुभ कस्तुरे
(लेखक, अभ्यासक)