गेल्या काही दिवसांमध्ये जम्मू काश्मीरच्या विविध भागांमध्ये दहशतवादी हल्ले झाले आहेत. यानंतर आता थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऍक्शन मोडवर आले आहेत. जम्मू- काश्मीरमध्ये घडत असलेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर गुरुवार, १३ जून रोजी नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. बैठकीदरम्यान, पंतप्रधानांना जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा सर्वसमावेशक आढावा देण्यात आला, तसेच दहशतवादविरोधी चालू असलेल्या प्रयत्नांची देखील माहिती देण्यात आली.
परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी जम्मू- काश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी देशाच्या दहशतवादी विरोधी क्षमतांचा संपूर्ण वापर करत प्रत्युत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. पंतप्रधान मोदींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जम्मू- काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशीही चर्चा केली. मनोज सिन्हा यांनी सध्या सुरक्षा दलाकडून दहशतवाद विरोधी सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल माहिती दिली.
हेही वाचा..
मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, सरकारसोबत चर्चेला तयार!
नागपूरमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत झालेल्या स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू
अरुणाचल प्रदेशात पुन्हा भाजप सरकार, पेमा खांडूं बनले मुख्यमंत्री!
गेल्या चार दिवसांत रियासी, कठुआ आणि डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १० यात्रेकरू, एक सीआरपीएफ जवान ठार झाले आहेत. तर, सात सुरक्षा रक्षकांसह अनेक जण जखमी झाले आहेत. सुरक्षा दलाकडून मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू असून जम्मू-काश्मीर पोलिसांनी डोडा जिल्ह्यातील दोन हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या चार दहशतवाद्यांची रेखाचित्रेही जारी केली आहेत. तसेच त्यांच्याबद्दलची माहिती देणाऱ्याला २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. दुसरीकडे, राजौरी आणि जम्मू जिल्ह्यातील सुंदरबनी, नौशेरा, डोमाना, लांबेरी आणि अखनूर भागांसह खोऱ्यातील अनेक जिल्ह्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.