शाकीब, बांगलादेशबद्दल आदर आता कमी झाला!

श्रीलंकेचा फलंदाज अँजेलो मॅथ्यूजने टाईम आउटच्या निर्णयानंतर व्यक्त केली नाराजी

शाकीब, बांगलादेशबद्दल आदर आता कमी झाला!

विश्वचषक स्पर्धा २०२३ सध्या भारतात सुरू असून या स्पर्धेच्या ३८ व्या सामन्यात श्रीलंका आणि बांगलादेशचे संघ आमनेसामने आले होते. सोमवार, ६ नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूज याला बाद देण्याचा निर्णय चांगलाच चर्चेत आला आहे. अँजेलो मॅथ्यूज याला टाईम आऊट करण्यात आले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात टाईम आऊट होणारा तो पहिलाचं फलंदाज ठरला. मात्र, या निर्णयावर जगभरातून निरनिराळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत मॅथ्यूज यानेही त्याचे मत मांडत नाराजी व्यक्त केली आहे. अँजेलो मॅथ्यूज म्हणाला की, “शाकिब आणि बांगलादेशची कृती ही अत्यंत लज्जास्पद आहे. त्यांना असे क्रिकेट खेळायचे असेल तर ते अत्यंत लाजिरवाणे आहे. इतर कोणत्याही संघाने हे केले असते असे मला वाटत नाही. मी त्यांना अपील मागे घेण्यासही सांगितले पण त्यांनी नकार दिला. यापूर्वी मी शाकिब आणि बांगलादेशचा खूप आदर करायचो पण आता ते माझ्या नजरेतून पडले आहेत. मी वेळ वाया घालवत नव्हतो. मी क्रीजवर असल्याचे सर्वांना दिसत होते पण माझ्या हेल्मेटचा पट्टा तुटला होता.”

तो पुढे म्हणाला की, “मी वेळेवर क्रीजवर पोहोचल्याचे व्हिडिओ पुरावे आमच्याकडे आहेत. मी क्रीजवर पोहोचलो तेव्हा माझ्याकडे अजून पाच सेकंद बाकी होते. यानंतर माझ्या हेल्मेटमध्ये समस्या असल्यास मी काय करू शकतो? हा खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. हेल्मेट न घालता यष्टिरक्षक स्पिनरविरुद्ध विकेट मागे थांबत नसेल तर मी गोलंदाजाचा सामना कसा करू शकतो. अंपायरने मला आऊट देण्यापूर्वी तंत्रज्ञानाचा अवलंब करायला हवा होता. तंत्रज्ञान उपलब्ध असेल तर त्याचा वापर करायला हवा,” असे मत मांडत अँजेलो मॅथ्यूज याने नाराजी व्यक्त केली.

सामन्यानंतरही श्रीलंकेच्या खेळाडूंनी बांगलादेशच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. त्यावर मॅथ्यूज म्हणाला की, “जर कोणताही संघ त्यांचा आदर करत नसेल तर त्यांचा आदर आम्ही कसा करणार?” दरम्यान, मॅथ्यूज याने ट्वीटरवर या घटनेचा व्हिडीओ शेअर करत टाईम आउट नसल्याचे म्हटले आहे.

या प्रकरणावर अनेकांनी बांगलादेशच्या संघाने खिलाडूवृत्ती न दाखवल्याने त्यांच्यावर टीका केली आहे. भारतीय माजी क्रिकेटपटूंनी देखील या निर्णयावर टीका केली आहे. गौतम गंभीर याने दिलीतील मैदानावर घेण्यात आलेला हा निर्णय खेदजनक असल्याचे म्हटले आहे. तर, हरभजन सिंह यानेही शाकीब याने अपील करणं आणि त्याहीपुढे मॅथ्यूजला आउट देणं हा मूर्खपणा होता, असे मत मांडले आहे.

हे ही वाचा:

मणिपूरच्या पोलिसांचे आसाम राय़फल्सने वाचवले प्राण!

नेपाळमध्ये ५.६ रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्यात आठ हजार घरांचे नुकसान!

जरांगे पाटील यांच्याविरोधात भुजबळांनी दंड थोपटले!

भारताविरुद्धचा पराभव लागला जिव्हारी; संपूर्ण श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त

प्रकरण काय?

सदिरा समरविक्रमा बाद झाल्यानंतर अँजलो मॅथ्यूज खेळण्यासाठी मैदानात आला. त्याने स्ट्राईकही घेतली, पण हेल्मेटचा भाग तुटल्याचे लक्षात आल्यामुळे मॅथ्यूजने ड्रेसिंग रुममधून हेल्मेट मागवले. यासाठी दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ गेला. त्यामुळे बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसन याने पंचाकडे बाद देण्याची दाद मागीतली. त्यानंतर मैदानावर थोडावेळ राडा झाला. पण, क्रिकेटच्या नियमांनुसार, कोणत्याही फलंदाजाला दोन मिनिटांच्या (१२० सेकंद) आत स्ट्राईक घ्यावी लागते. पण, हेल्मेट नसल्यामुळे मॅथ्यूजला स्ट्राईक घेता आली नाही आणि शाकीबने पंचांकडे दाद मागितली. नियमांनुसार, पंचांनी त्याला बाद दिले.

Exit mobile version