गोगरा पॉईंटवर तोडगा निघाला!!!

गोगरा पॉईंटवर तोडगा निघाला!!!

भारत आणि चीनदरम्यान लष्करी चर्चेची १२ वी फेरी नुकतीच पार पडली. या चर्चेत पेट्रोल पॉईंट १७ ए म्हणजेच गोगरा पॉईंटपासून आपापलं सैन्य माघारी घेण्याबाबत दोन्ही देशांमध्ये एकमत झालं असल्याचं कळतंय. त्यामुळे लडाख सीमेवरचा तणाव काहीसा निवळण्याची चिन्हं दिसत आहेत. भारत आणि चीनदरम्यान मागच्या अनेक महिन्यांपासून तणावाची स्थिती आहे. दोन्ही सैन्यांनी सीमारेषेजवळ (एलएसी) आपापलं सैन्य तैनात केलं आहे. अशा परिस्थितीत परिस्थितीत निवळण्यासाठी दोन्ही देशांमध्ये लष्करी स्तरावर सातत्यानं बैठका होत आहेत.

याआधी दोन्ही सैन्यामध्ये चर्चेच्या ११ फेऱ्या झाल्या. मात्र, त्यात विशेष तोडगा निघू शकला नव्हता. आता १२ व्या फेरीत दोन्ही देशांनी आपापलं सैन्य माघारी घेण्याचं ठरवलं आहे. सीमेवरचा तणाव कमी करण्यासाठी ३१ जुलैला चुशुल-मोल्दो सीमेवर चर्चेची १२ वी फेरी पार पडली. त्यानंतर २ ऑगस्टला एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

सैन्य माघारी बोलावण्यावर लवकरच कार्यवाही केली जाणार आहे. दोन्ही देश पीपी-१५ (हॉटस्प्रिंग) आणि डेपसांग मैदानांसहित इतर मुद्द्यांवर चर्चा सुरू ठेवतील. चर्चेच्या १२ व्या फेरीत भारत-चीन सीमारेषेच्या मुद्द्यावर चर्चा झाली. प्रोटोकॉलनुसार हे मुद्दे लवकरात लवकर सोडवण्यासाठी दोन्ही देशांनी चर्चेदरम्यान तयारी दर्शवली. चर्चेच्या ११ व्या फेरीदरम्यान चीनने हॉटस्प्रिंग, गोगरा आणि डेपसांग परिसरातून आपलं सैन्य माघारी घेण्यास नकार दिला होता. मात्र, भारतानं आक्रमकपणे बाजू लावून धरल्यानंतर चीनी ड्रॅगन काहीसा नरमलाय. अखेर १२ व्या फेरीत भारत आणि चीनमध्ये हॉट स्प्रिंग्स, डेपसांग आणि गोगरा भागातून सैन्य घेण्याचं ठरलं आहे.

हे ही वाचा:

…तर असे दिवसाला १०० गुन्हे दाखल करा, पण मी बोलत रहाणार

ईव्हीएम विरोधकांना न्यायालयाने काय चपराक लगावली?

अमित शहा-शरद पवार भेटीचे दरेकरांनी काय कारण सांगितले?

शरद पवारांनी का घेतली अमित शहांची भेट?

गेल्यावर्षी १५ जूनला भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात रोजी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार या संघर्षात दोन्ही बाजूंचे सैनिक जखमी झाले होते. पण भारताचे २० जवान मृत्युमुखी पडले होते. तब्बल ४५ वर्षांनंतर दोन्ही देशांमध्ये रक्तपात घडला होता. तर अमेरिका आणि रशियाच्या वृत्तसंस्थांनी या संघर्षात चीनचे ४० हून अधिक सैनिक मारले गेल्याचा दावा केला होता.

Exit mobile version