पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकात्याच्या सरकारी रुग्णालयात (आर. जी. कार मेडिकल कॉलेज) पोस्ट ग्रॅज्युएट प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीचा मृतदेह शुक्रवारी सापडला. प्रशिक्षणार्थी डॉक्टरची बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. यानंतर सरकारी रुग्णालयात झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी आर. जी. कार मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या प्राचार्यांनी राजीनामा दिला आहे.
आर. जी. कार मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाचे प्राचार्य डॉ. संदीप घोष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यावेळी ते म्हणाले की, “सोशल मीडियावर माझी बदनामी होत आहे. याप्रकरणात ज्या मुलीचा मृत्यू झाला ती माझ्या मुलीसारखी आहे. त्यामुळे पालक असल्याच्या नात्याने मी राजीनामा देत आहे. असे प्रकार भविष्यात कधीच घडू नयेत असं वाटतं. तिला वाचवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला. पण आमच्या चेस्ट विभागात तिचा मृत्यू झाला,” असं डॉ. संदीप घोष म्हणाले. डॉक्टरचा मृत्यू झाल्यानंतर सरकारी रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजचे प्राचार्य यांच्यावर टीका होत होती.
उत्तर कोलकत्यातील रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये ३१ वर्षीय महिला डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता. पीडित महिला डॉक्टर ही फुफ्फुस निदान केंद्रामध्ये कार्यरत होती. ती गुरुवारी रात्री रुग्णालयामध्ये कामाला आली होती. कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासणीत बलात्कार करून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. चौकशी अहवालानुसार, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहावर अनेक जखमा दिसत होत्या. तसेच मृतदेहावर अर्धवट कपडे होते. या घटनेमुळे रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला असून सखोल चौकशीच्या मागणीसाठी अनेक डॉक्टरांनी काम बंद केलं आहे.
हे ही वाचा :
पोलिसांना सापडला ‘मोरावर चोर’, तेलंगणातील यूट्युबरला अटक !
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरला अटकेपासून दिलासा
रामलला झाले अब्जाधीश, भाविकांनी अर्पण केले ५५ अब्ज रुपये !
दरम्यान, या घटनेनंतर सोमवारी पश्चिम बंगालमधील रुग्ण सेवा विस्कळीत झाली. ज्युनियर डॉक्टर, इंटर्न आणि पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींनी सलग चौथ्या दिवशी संप सुरू ठेवला. शिवाय त्यांनी एका महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येचा निषेध केला आणि तिच्या मृत्यूची दंडाधिकारी चौकशीची मागणी केली.