‘मार्ड’ या निवासी डॉक्टरांच्या संघटनेच्या संपानंतर राज्य सरकारने त्यांच्या समस्यांवर तोडगा काढल्यावर आता नायर आणि सायन रुग्णालयातील ऑक्युपेशनल आणि फिजिओथेरपीचे (ओटीपिटी) ७३ विद्यार्थी गेल्या ४ दिवसांपासून संपावर गेल्याने रुग्णालयांमधील सेवा कोलमडली आहे. ‘मार्ड’ प्रमाणे आमची संघटना नसल्याने आमच्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले.
गेल्या नऊ महिन्यांपासून रुग्णालय प्रशासनाकडे या विद्यार्थ्यांनी मागण्यांसाठी पत्रव्यवहार केला आहे. हे सर्व विद्यार्थी ओटीपिटी पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे निवासी डॉक्टर आहेत. त्यांच्या इतक्या महिन्यांच्या पाठपुराव्यानंतरही त्यासंदर्भात दखल घेतली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. हे निवासी डॉक्टर मे २०२० पासून ते आजपर्यंत कोरोना रुग्णांच्या सेवेत रुजू आहेत. कोरोना रुग्णांसोबतच हे सर्व डॉक्टर इतर विभागातही आपली सेवा देत आहेत.
हे ही वाचा:
नवाब मलिकांची मती भंगार मध्ये गेलेली
सीबीआयच्या सुबोध जैसवाल यांना सीआयडीचे समन्स
पवित्र पोर्टलमध्ये होते आहे ‘अपवित्र’ भरती
मुंबई पोलिसांनीही अमली पदार्थविरोधी मोहीम केली तीव्र
जानेवारी महिन्यापर्यंत पालिकेकडून १० हजार शिष्यवृत्ती मिळत होती. मात्र, नंतर तीही बंद झाल्याचे या निवासी डॉक्टरांचे म्हणणे आहे. कोरोना काळात निवासी डॉक्टरांनी दिलेल्या सेवेसाठी सरकारने त्यांना एक लाख २१ हजार रुपये प्रोत्साहन निधी देण्याचे मान्य केले. मात्र, यामध्ये त्यांना वगळल्याने त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे. टीडीएस कापला जात आहे. त्यातून सवलत मिळावी. सर्वांना समान शिष्यवृत्ती मिळावी, असे या निवासी डॉक्टरांचे म्हणणे आहे.
‘मार्ड प्रमाणे या डॉक्टरांचे निवेदन देखील शासनाकडे पाठविले आहे. कामबंद हा यावरील उपाय नाही. मागण्या मान्य होण्यासाठी वेळ लागेल. याचा पाठपुरावा करत असल्याचे मुख्य पालिका रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.