उत्तराखंडमधील बचावकार्य अजूनही सुरूच

उत्तराखंडमधील बचावकार्य अजूनही सुरूच

दिनांक ७ फेब्रुवारी रोजी उत्तराखंडमध्ये महाप्रलय आला. हिमकडा कोसळल्यामुळे तिथल्या ऋषिगंगा नदीत महापूर आला. त्याबरोबरच इतर नद्यांनाही पूर आला. त्यामुळे या नद्यांवरील गावांना धोका निर्माण झाला. या नद्यांवरील एनटीपीसीच्या तपोवन विष्णुगड प्रकल्पातील बोगद्यात सुमारे ३० कामगार अडकले असण्याची शक्यता आहे. त्यांना वाचवण्याचे कार्य युद्धपातळीवर चालू आहे.

या प्रकल्पाव्यतिरिक्त ऋषिगंगा जलविद्युत प्रकल्पाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. उत्तराखंडमधील संकटात अडकलेल्या ३० कामगारांव्यतिरिक्त १७५ लोक अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्याचे कार्य देखील चालू आहे. या ठिकाणी एकूण ६०० बचावकर्मींची फौज या कामगारांना वाचवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे.

गावांचा संपर्क तुटला

ऋषिगंगा, धौलीगंगा या नद्यांना अचानक पूर आल्याने दोन प्रकल्पांचे नुकसान झाले. त्याबरोबरच १३ गावांना जोडणारा पूल वाहून गेल्याने या गावांचा संपर्क तुटू गेला आहे. या गावांमध्ये एकूण साधारणपणे २,५०० लोकांची वस्ती आहे. त्यांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यासाठी बचाव दलाने झिप लाईन बनवली आहे.

रुद्रप्रयाग, श्रीनगर येथे सापडले मृतदेह

उत्तराखंड मधील दुर्घटनेत अनेक लोक वाहून गेली असण्याची शक्यता आहे. त्यापैकी काही मृतदेह खाली रुद्रप्रयाग, श्रीनगर येथे देखील सापडले आहे. अलकनंदा नदीच्या जोरदार प्रवाहामुळे हे मृतदेह नदीच्या खालच्या अंगाला सापडले.

Exit mobile version