वेब पोर्टलवर १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर २०२१ दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना सादर केलेल्या प्रतिष्ठित आणि संस्मरणीय भेटवस्तूंच्या ई- लिलावाची तिसरी आवृत्ती आयोजित करण्यात आली आहे. टोकियो २०२० पॅरालिम्पिक स्पर्धा आणि टोकियो २०२० ऑलिम्पिक स्पर्धेच्या विजेत्यांनी पंतप्रधानांना भेटवस्तू दिलेल्या क्रीडा साहित्यांचाही यामध्ये समावेश आहे. तसेच कलाकृतींमध्ये अयोध्या राम मंदिराची प्रतिकृती, चारधाम, रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर, मॉडेल, शिल्प, चित्रे आणि वस्त्र यांचा समावेश आहे. ई- लिलावाच्या या टप्प्यात सुमारे १३३० स्मृतिचिन्हांचा लिलाव केला जात आहे.
या मोहिमेत मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांनी भाग घेत अयोध्या राम मंदिराच्या प्रतिकृतीसाठी ५१ लाख रुपयांची बोली लावली आहे. जी आतापर्यंतची या प्रतिकृतीसाठी लावण्यात आलेली सर्वाधिक बोली आहे. अयोध्या राम मंदिराची ही प्रतिकृती लाकडापासून बनलेली आहे, ज्यांची लांबी ६८ सेमी, रुंदी ५२ सेमी, उंची ५३ सेमी असून वजन २३ किलो आहे.
हे ही वाचा:
बापरे!! वर्षभरात अमलीपदार्थांचा डोंगरच उपसला
शाळेत जाणाऱ्या शिक्षकांनाच झाली शिक्षा!
… आणि म्युकरमायकोसिसमुळे बसवावा लागला कृत्रिम जबडा
मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई- लिलावाद्वारे देशाच्या सेवेत योगदान देण्याची आपल्या सर्वांना एक संधी दिली आहे, त्यासाठी त्यांचे आभार मानतो. विश्वगुरूच्या दिशेने वाटचाल करणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेली ही भेट आमच्याकडे येणारा एक ऐतिहासिक वारसा बनेल. तसेच भारताची आर्थिक राजधानी त्यांच्या मागे उभी आहे, हा संदेश जगभर गेला पाहिजे.
ई- लिलावातून मिळालेली संपूर्ण रक्कम गंगा नदीचे संवर्धन आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या उद्देशाने ‘नमामि गंगे’ अभियानाला दिली जाईल. मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांनी देशाच्या उदात्त कारणासाठी मिळालेल्या सर्व भेटवस्तूंचा “नमामि गंगे” द्वारे देशाची जीवनरेखा- गंगा नदीच्या संवर्धनासाठी लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.