अनाथांची माय म्हणून देशभरात ओळख असलेल्या थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी पुण्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. सिंधुताईंच्या निधनाने महाराष्ट्र पोरका झाल्याची भावना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली आहे.
सिंधुताईंवर नोव्हेंबर महिन्यात शस्त्रक्रिया झाली होती. त्यांना पोटदुखीचा त्रास जाणवत असल्याने गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली. पण त्यातून त्या सावरल्याच नाहीत. त्यांच्या तब्येतीत गेल्या महिन्याभरात चढऊतार जाणवत होते. पण त्यात पूर्ण सुधारणा झालीच नाही.
गेल्या वर्षी त्यांना अद्वितीय सामाजिक कार्याबद्दल प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
अत्यंत संघर्षमय असे वैयक्तिक जीवन जगलेल्या सिंधुताई यांनी आपल्या या संघर्षाबद्दल तक्रार न करता वाटचाल केली. त्या अनाथांची आई बनल्या. हजारो अनाथ मुलांना त्यांनी आपल्या पदराखाली घेतले. भुकेल्या पोटीही त्यांनी अनाथांचाच विचार केला. भुकेतून त्यांनी प्रेरणा घेतली.
हे ही वाचा:
मुस्लिम लॉ बोर्ड म्हणते, सूर्यनमस्कार असंवैधानिक!
चिन्यांना प्रत्युत्तर; भारतीय सैन्याने गलवान खोऱ्यात फडकावला तिरंगा
उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या मॅरेथॉन रॅलीत चेंगराचेंगरी, मुले जखमी
कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करणारी पालिका अमिताभ बाबत गप्प!
वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे सिंधुताईंचा जन्म झाला होता. कोवळ्या वयात त्यांचा विवाह झाला. १८ वय पूर्ण होण्याआधीच तीन बाळंतपणे त्यांना सोसावी लागली. त्यानंतर त्यांचा जीवनप्रवास अत्यंत संघर्षमय असाच होता. पण काबाडकष्ट करत, अन्यायाविरुद्ध आवाज उठवत, समाजासाठी झटत त्यांची वाटचाल सुरू राहिली. या वाटचालीत असंख्य अनाथांना मायेची सावली त्यांनी दिली.
सिंधुताईंना महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार, सावित्रीबाई पुरस्कार, फाय फाऊंडेशन पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.