राज्य शासनाने ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीनंतर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने दरवर्षी हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.
ज्येष्ठ समाजसेवक आप्पासाहेब धर्माधिकारी यांना २०२२ वर्षासाठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यापूर्वी धर्माधिकारी यांना केंद्र सरकारच्यावतीने दिला जाणारा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांची बुधवारी रेवदंडा येथे भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पद्मश्री डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म १४ मे १९४६ रोजी झाला. गेली ३० वर्षे ते निरूपण करत आहेत. आदिवासी वाड्या, वस्त्यांमध्ये व्यसनमुक्तीचे मोठे कामही ते करत आहेत. डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. अलीकडच्या काळात संस्थेने जास्तीत जास्त वृक्षारोपण केले आहे. याशिवाय वृक्ष संवर्धन, तलाव व स्वच्छता मोहीम, रक्तदान शिबिरेही नियमितपणे आयोजित केली जातात. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवानंतर निर्माल्यपासून कंपोस्ट खत तयार करून त्यांनी समाजाला पर्यावरणपूरक संदेशही दिला आहे. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना स्वच्छता दूत असेही म्हणतात.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरे पक्षाच्या भवितव्याबाबत चिंताग्रस्त?
नाणार होणार, ठाकरे गटाचे काय जाणार?
अदानीचं जबरदस्त पुनरागमन, शेअर्समध्ये बंपर तेजी..जाणून घ्या कोणते शेअर्स किती वाढले
आता चिल्लर घ्यायला एटीएममध्ये जा!
आप्पासाहेबांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे झाले. लहानपणापासूनच त्यांना कीर्तन, भजन, अध्यात्मिक वाचनाची आवड होती. याशिवाय मैदानी खेळ आणि पोहण्याचीही त्यांना खूप आवड होती. आप्पासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य तळागाळातील प्रत्येक माणसासाठी समाजसेवेसाठी समर्पित केले आहे. हे काम त्यांचे वडील डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांनी १९४३ पासून सुरू केले होते आणि आज तेच काम आप्पासाहेब धर्माधिकारी तितक्याच उत्साहाने आणि तत्परतेने जगभर पोहोचवत आहेत.