स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून सध्या महाराष्ट्रात चर्चा सुरू असताना धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी ही समाधी हटविण्याची मागणी करणारे छत्रपती संभाजी भोसले यांची रायगड प्राधिकरणावरून पहिल्यांदा हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी केली आहे. ते म्हणाले की, सरकारने अशा लोकांना तंबी दिली पाहिजे. वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या बाबतीमध्ये काही घटना घडली तर महाराष्ट्रातील धनगर समाज अजिबात खपवून घेणार नाही. तसेच वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. तसेच कोर्टातही जाणार असल्याचे हाके यांनी सांगितले.
लक्ष्मण हाके यांनी आज (२५ मार्च) पुण्यात पत्रकार परिषद घेत संभाजी राजेंच्या मागणीवर प्रश्न उपस्थित केले. यावेळी इतिहासतज्ञ संजय सोनवणी देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी वाघ्या कुत्र्याचा आणि समाधीचा पुरावा सादर करत जुन्या काळात याचा उल्लेख असल्याचे संदर्भ दिले.
लक्ष्मण हाके म्हणाले, होळकरांनी, टिळकांनी, महात्मा ज्योतीराव फुले यांनी ज्या भावनेने समाधीचा जीर्णोद्धार केला त्यावेळापासून जवळपास ८० वर्षे झाले, या कालावधीत कोणच तज्ञ मंडळी नव्हती?. ३१ मे रोजी अहिल्याबाई होळकरांचा त्रिशतकोत्तर (३०० वी ) जन्मोत्सव शताब्दी महोत्सव होत आहे हीच तारीख संभाजी भोसलेंना अल्टीमेट द्यावी अशी का वाटली. वाघ्या कुत्रा म्हटले कि होळकरांचा संदर्भ येतो, काही इतिहासकार जे दुकान लावून बसले आहेत त्यांच्या पूर्वजांनी छत्रपती शिवरायांच्या या सगळ्या गोष्टींना विरोध केला आहे.
इतिहासकार संजय सोनवणी म्हणाले, याबाबत पुराव्यानिशी संदर्भ आहे. २०१२ साली माझे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा इंद्रजीत सावंत यांनी मला फोन केला आणि म्हणाले पुरावा असेल तर मान्य करावे लागेल. मात्र, आता ते उलट फिरले आहेत. हा पुतळ्याचा प्रश्न आजचा नसून २००८ पासूनचा आहे. दरवर्षी शिवजयंती, राज्याभिषेकदिनाच्या अगोदर हा पुतळा काढणार अशी मागणी संभाजी ब्रिगेड करत होती. वाघ्या पुतळ्याच्या मागे एवढे हे हातधुवून मागे का लागलेत?, हा मला प्रश्न पडला आहे. वाघ्या एवढ्या डोळ्यात का शिरतो?, याचा मी अभ्यास करत गेलो, यानंतर पुरावे मिळत गेले आणि त्यावर मी नंतर पुस्तक लिहिले.
ते पुढे म्हणाले, १३ वर्षानंतर ही गोष्ट पुन्हा का उकरून काढली जात? हा प्रश्न आहे. कारण तो पुतळा काढला पुन्हा बसवला, पुरातत्व खात्यानेच बसवला. पुरातत्व खात्याला जर असे वाटेल असते कि ही समाधी १०० वर्षांपूर्वीच्या आतील आहे तर पुन्हा पुतळा बसलाच नसता. त्यामुळे पुतळ्या संदर्भात कोणताही निर्णय असेल तर तो पुरातत्व खात्याला घ्यावा लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणे याला काही अर्थ नाही.
हे ही वाचा :
कर्जतचे फार्म हाऊस, ड्रग्ज, मुलांचे लैंगिक शोषण मेंदू गरगरवणारे आरोप…
सोने खरेदीसाठी हवालाद्वारे पाठवलेल्या पैशांचा वापर केल्याची रान्या रावची कबुली
अवैध मदरसांवर सरकारच्या कारवाईला बोर्डचा पाठिंबा
काँग्रेसने आपला अजेंडा आणि झेंडा मुस्लिम लीगच्या कार्यालयात सरेंडर केला
मुळात म्हणजे पुतळ्याबाबत ज्यांना काही अधिकार आणि ज्यांचा काही संबध नाही अशा व्यक्तींना संभाजी भोसलेंनी पत्र लिहिले आहे. ‘आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी,’ असा हा प्रकार आहे. पंतप्रधानांना एकवेळ पत्र लिहले असते तर चालले असते. मात्र, तसे त्यांनी केले नाही. यामागे संभाजी भोसलेंचा काही राजकीय हेतू असावा. जुन्या पुस्तकांमध्ये, नाटकांमध्ये वाघ्याचा संदर्भ आहे. त्यामुळे वाघ्या नाव, कुत्रा, पुतळा काल्पनिक नाहीये, असे संजय सोनवणी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, याबाबत मी आता राज्यपाल, मुख्यमंत्री, विरोधी पक्षाला, पंतप्रधानांना पत्र लिहीन आणि अशा प्रकारची कोणतीही अनऐतिहासिक वक्तव्ये करून समाजामध्ये तेढ निर्माण करू नये, याच्यावर बंदी घालावी, याबाबत हाय कोर्टामध्ये मागणी करणार आहे.