इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या मोसमातील उर्वरित सामन्यांबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. आयपीएल २०२१ च्या मोसमातील उर्वरित ३१ सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहेत, असं बीसीसीआयने स्पष्ट केलंय. ही माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली आहे.
टी -१० विश्वचषक भारतात होणार आहे, परंतु कोरोना संसर्गाचा प्रदुर्भाव पाहता बीसीसीआय टी-२० विश्चचषक स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करू शकते, अशी शक्यता आहे. बीसीसीआयने आयसीसीकडे टी-२० वर्ल्डकपच्या आयोजनाच्या परिस्थितीविषयी स्पष्टीकरण देण्यासाठी २८ जूनपर्यंत मुदत मागितली आहे.
आयपीएल २०२१ मधील २९ सामने यापूर्वीच खेळविण्यात आले आहेत. ज्यानंतर अनेक खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाचा संसर्ग झाला आणि परिणामी कोरोनाच्या संक्रमणामुळे आयपीएलचं १४ वं पर्व अनिश्चित काळासाठी पुढे ढकलावं लागलं.
संपूर्ण आयपीएलच्या नियोजनात परदेशी खेळाडू आणि त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा मुख्य असणार आहे. सर्व खेळाडूंना एका बायो बबलमधून दुसऱ्या बायो बबलमध्ये सुरक्षितपणे घेऊन जाण्याच्या मुद्यावर अधिक चर्चा होईल. त्यातच इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यांचे खेळाडू टी-२० विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेआधी आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे काही दिवसांपूर्वी सांगितले होते. त्यामुळे इतर क्रिकेट बोर्डांची काय भूमिका आहे, यावर ही चर्चा करण्यात येईल.
हे ही वाचा:
मालाडच्या मालवणीत बिल्डींग कोसळून ११ जणांचा मृत्यू
मुंबई तुंबण्याला जबाबदार मुख्यमंत्री की मुंबई महापालिका?
आता किमान पावसाची जबाबदारी मोदींवर ढकलू नका
सेलिब्रिटीजच्या मुंबई प्रेमावर नितेश राणे बरसले
आयपीएलमधील संघाना बीसीसीआय स्पर्धेचे योग्यप्रकारे नियोजन करेल आणि परदेशी खेळाडूंना स्पर्धेसाठी नक्की आणेल असा विश्वास आहे. याबाबत बोलताना एका संघाचा अधिकारी म्हणाला की, ”बीसीसीआयच्या विशेष बैठकीनंतर आम्हाला कळालं की बीसीसीआय परदेशी खेळाडूंशी चर्चा करत आहे. त्याच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न करत आहे. आम्हाला काही खेळाडूंची कमी भासू शकते, त्याबाबत लक्ष देण्याची गरज आहे.”