जगातील बलाढ्य माध्यम कंपनी वॉल्ट डिस्ने व मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स इंडस्ट्रिज यांच्यात ७० हजार ३५२ कोटी रुपयांचा भागीदारी करार झाला आहे. रिलायन्सने या संदर्भात बुधवारी घोषणा केली. मुकेश अंबानी यांच्या पत्नी निता अंबानी ‘जेव्ही’ या नव्या माध्यम समूहाच्या अध्यक्ष असतील. तर, उदय शंकर हे उपाध्यक्ष असतील.
या करारानुसार, व्हायाकॉम १८चे स्टार इंडिया प्रा. लिमिटेडमध्ये विलिनिकरण होत आहे. हे विलिनीकरण पूर्ण झाल्यास या नव्या कंपनीच्या भांडवलातील ६३.१६ टक्के हिस्सा रिलायन्सकडे तर, उर्वरित म्हणजे ३६.१६ टक्के हिस्सा हा डिस्नेकडे असणार आहे. रिलायन्स समूहाच्या ६३.१६ टक्के हिश्शांपैकी रिलायन्स इंडस्ट्रीजकडे १६.३४ टक्के तर, व्हायकॉम १८कडे ४६.८२ टक्के हिस्सा असेल. ओटीटी व्यवसायवाढीसाठी रिलायन्स या कंपनीत ११ हजार ५०० कोटी रुपये गुंतवणार आहे.
या करारास नियामक व भागधारकांची मंजुरी मिळण्याची औपचारिकता बाकी आहे. ही प्रक्रिया २०२४च्या शेवटच्या तिमाहीत अथवा २०२५च्या सुरुवातीस पूर्ण होईल.
हे ही वाचा:
‘ज्यांची मुले ड्रग्जचे सेवन करतात, त्यांच्या पालकांबद्दल वाईट वाटते’
३ मार्चपर्यंत मराठा आंदोलन स्थगित
ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांचे बीसीसीआयचे वार्षिक कंत्राट रद्द
कन्फर्म… ठाकरे गटाचे बडगुजर सलीम कुत्तासोबत नाचत होते!
या विलिनीकरणानंतर कलर्स, स्टार प्लस, स्टार गोल्ड, स्टार स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स १८ या वाहिन्या तसेच, जीओसिनेमा आणि हॉटस्टार हे ओटीटी मंच एका छताखाली येणार आहेत. त्यायोगे जेव्ही ही कंपनी भारतातील साडेसात कोटी प्रेक्षकापर्यंत पोहोचेल. या विलिनीकरणानंतर अस्तित्वात येणाऱ्या माध्यम-मनोरंजन कंपनीद्वारे विविध भाषांतील शंभरहून अधिक वाहिन्या, दोन ओटीटी मंच प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार आहेत.
‘हा एक महत्त्वाचा करार आहे, ज्यायोगे भारतीय मनोरंजन उद्योगात एका नव्या युगाची सुरुवात होत आहे. आम्ही जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट माध्यम समूह म्हणून डिस्नेचा नेहमीच आदर केला आहे आणि हा धोरणात्मक संयुक्त उपक्रम तयार करण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत, ज्यायोगे आम्हाला आमची व्यापक संसाधने, सर्जनशील कामगिरी आणि बाजारपेठेतील गमक एकत्रित करून देशभरातील प्रेक्षकांना परवडणाऱ्या किमतीत अतुलनीय सामग्री वितरीत करण्यास मदत करेल. रिलायन्स समूहाचा प्रमुख भागीदार म्हणून आम्ही डिस्नेचे स्वागत करतो,’ अशी प्रतिक्रिया या करारावर भाष्य करताना मुकेश अंबानी यांनी दिली.