कोविडवर लाल मुंग्यांची चटणी रामबाण उपाय

कोविडवर लाल मुंग्यांची चटणी रामबाण उपाय

संपूर्ण जगाचं लक्ष कोविड-१९ लसीकडे लागलेले असताना, भारतात मात्र लाल मुंग्यांची चटणी कोविडवरचा उपाय ठरू शकते का? या विषयी चर्चा सुरु झाली आहे. ओडिशा उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरुन ही चर्चा सुरु झाली आहे. लाल मुंग्यांची चटणी कोविडवर उपाय ठरू शकते का? या विषयी आयुष मंत्रालय आणि कौन्सिल ऑफ सायन्टिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चने (सीएसआयआर) पुढील तीन महिन्यात याबाबत निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने आदेश दिले आहेत.

ओडीशाच्या बैपाडा इथे राहणाऱ्या नवधार पढियाल या इंजिनीअरच्या जनहित याचिकेवर ओडिशा न्यायालयाने निकाल दिला आहे. भारतातील वनवासी पाड्यांमध्ये वर्षानुवर्षे लाल मुंग्यांची चटणी हा आहारातील महत्वाचा घटक आहे. या चटणीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असून ताप, श्वसनाचा विकार यावर औषध म्हणून वनवासी बांधव ही चटणी वापरतात. या चटणीमुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यासही मदत होते. चटणीचे हे गुणधर्म लक्षात घेता ही चटणी कोविडवर उपाय ठरू शकते का? या विषयी संशोधन करण्याचा प्रस्ताव पढीयाल यांनी आयुष मंत्रालयाकडे पाठवला होता. पण २३ जून आणि ७ जुलै रोजी पाठवलेल्या प्रस्तावाची आयुष मंत्रालय आणि सीएसआयआर यांनी कोणतीही दखल घेतली नाही. अखेर पढियाल यांनी या संदर्भात न्यायालयाचे दार ठोठावले.

न्यायालयाच्या आदेशानुसार आता या विषयावर संशोधन होणार आहे. पुढील तीन महिन्यात याबाबत निर्णय घेणे आयुष मंत्रालय आणि सीएसआयआरला बंधनकारक आहे. त्यामुळे लाल मुंग्या आणि हिरव्या मिरचांपासून बनवलेली चटणी हे कोविडवर उपाय ठरतो का? हे येत्या तीन महिन्यात स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version