एप्रिल महिन्यात मुंबईमध्ये तब्बल नऊ हजार ८६७ निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांची विक्री झाली आहे. यातून सुमारे ८४० कोटी रुपयांचा महसूल राज्य सरकारच्या तिजोरीत जमा झाला आहे. एप्रिल महिन्यातील उत्पन्नाचा हा गेल्या दहा वर्षांतील विक्रम आहे. निवासी आणि अनिवासी मालमत्ता विकून हा महसूल मिळाला आहे.
नाइट फ्रँक इंडियाने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही बाब उघड झाली आहे. एप्रिलमध्ये एकूण ८३ टक्के निवासी तर १७ टक्के व्यावसायिक मालमत्तांची नोंदणी झाली. स्टॅम्प ड्युटीचे वाढलेले दर आणि उच्च किमतीच्या मालमत्तांचे झालेले व्यवहार याचा परिणाम या महसूलवाढीवर दिसून आल्याचे अहवालात म्हटले आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात ११ हजार ७४३ मालमत्तांची विक्री झाली होती. त्यातून राज्य सरकारला ७३८ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता.
एक कोटीचे घर लोकप्रिय
मुंबईत एक कोटीचे घर हे सर्वांत लोकप्रिय असल्याचे आढळून आले आहे. कारण एप्रिल महिन्यात या किमतीच्या श्रेणीतील तब्बल ४९ टक्के घरांची नोंदणी झाली आहे.
हे ही वाचा:
कुस्तीगीरांच्या आंदोलनात राजकारण शिरले; प्रियांका गांधींनी घेतली खेळाडूंची भेट
सत्यपाल मलिक यांच्यावर पाच तास प्रश्नांची सरबत्ती
नारायण कार्तिकेयनला गवसला उद्योगाचा ‘फॉर्म्युला’; दोन वर्षांत १७८ कोटींचा उद्योग
…तर बृजभूषण सिंह राजीनामा देण्यास तयार
पश्चिम उपनगरात ५४ टक्के मालमत्तांची विक्री
एप्रिलमध्ये नोंदणी झालेल्या एकूण मालमत्तांपैकी तब्बल ५४ टक्के मालमत्ता या पश्चिम उपनगरांमधील आहेत. तर, ३० टक्के मालमत्ता या मध्य मुंबईतील आहेत. यातील दक्षिण मुंबईचा वाटा हा १० टक्के आहे.
५०० ते १००० चौ. फुटांची घरे लोकप्रिय
५०० ते एक हजार चौ. फुटांची घरांची लोकप्रियता ग्राहकांमध्ये कायम आहे. संपूर्ण मालमत्ता नोंदणीमध्ये सुमारे ४४ टक्के वाटा या घरांचा आहे. तर, ५०० चौ. फुटांपेक्षा कमी घरांच्या नोंदणीत किंचित घसरण झाली. एप्रिल २०२२मध्ये या श्रेणीतील ३६ टक्के घरांची नोंदणी झाली होती. तर, यंदा एप्रिल २०२३मध्ये ३२ टक्के घरांची नोंद झाली. तर, एक हजार चौ. फुटांपेक्षा अधिक घरांच्या नोंदणीचे प्रमाण हे २४ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण १७ टक्के होते.
पाच कोटींपेक्षा कमी किमतीच्या मालमत्ता नोंदणीमध्ये मध्य आणि पश्चिम उपनगरांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तर, पाच कोटींहून अधिक रकमेचे व्यवहार हे प्रमुख्याने मध्य आणि दक्षिण मुंबईत झाले आहेत.
३१ ते ४५ वयोगट प्रामुख्याने ग्राहक
एप्रिल महिन्यातील या अहवालानुसार, निवासी मालमत्तांचे ग्राहक हे प्रामुख्याने ३१ ते ४५ वयोगटातील आहेत. एकूण निवासी मालमत्तांच्या नोंदणीतील या वयोगटातील ग्राहकांचे प्रमाण ४४ टक्के आहे. तर, घरे खरेदी करणारे १२ टक्के ग्राहक हे ३० वर्षांखालील वयोगटाचे आहेत. तर, ३० टक्के ४६ते ६० वयोगटातील आहेत. तर, ६० वर्षांवरील व्यक्तींचे प्रमाण १४ टक्के आहे.