छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या उत्तरेकडील भागात असलेला हिमालय पूल दोन वर्षांपूर्वी कोसळून या दुर्घटनेत सात जणांनी आपला जीव गमावला, तर ३० जण जखमी झाले होते. पालिकेने आता या पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामाला सुरुवात केली आहे. दुर्घटना झाल्यापसून या पुलाचे जिने तसेच ठेवले होते, ते आता पाडण्यात आले आहेत. पुलाच्या कामाच्या ठिकाणी नागरिकांना सध्या प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे.
हिमालय पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामासाठी ६.४ करोड खर्च होणार असून पावसाळ्याचे महिने वगळून १५ महिन्यात काम पूर्ण करणे अपेक्षित आहे. हजारो मुले संस्थेत शिक्षण घेतात त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पुलाचे बांधकाम करताना ‘राईट ऑफ वे’चे संरक्षण व्हावे, असे पंधरा दिवसांपूर्वी अंजुमन-ए-इस्लाम या संस्थेकडून पालिकेला सांगण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर दोन ठिकाणी हा पूल उतरण्यासाठी वापरला जातो. त्यातील एक बाहेर पडण्याचा मार्ग हा अंजुमन-ए-इस्लाम संस्थेच्या एका प्रवेशद्वारासमोर आहे. अंजुमन-ए-इस्लाम संस्थेत साधारण ७००० विद्यार्थी असून एक प्रवेशद्वार अपुरे पडते आणि त्यांची गैरसोय होऊ नये, असे अंजुमन-ए-इस्लाम संस्थेचे मुदस्सर पटेल यांनी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना सांगितले.
हे ही वाचा:
अनिल परबांची चौकशी करा! लोकायुक्तांना राज्यपालांचा हिरवा कंदिल
बाळासाहेबांच्या नावावर हडपलेल्या महापौर बंगल्यात बिल्डरांची गर्दी होते ते कसे चालते?
संस्थेने त्यांची बाजू मांडली. पण पुलाचे काम करताना एक छोटासा बदल केला जाणार आहे तो म्हणजे पुलाच्या बाहेर पडण्याचा मार्ग त्याच पदपथावर थोडासा पुढे सरकवण्यात येणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त पी वेलरसू यांनी सांगितले. पुलाच्या बाहेर पडण्याच्या मार्गामध्ये बदल करायचा की नाही या वादामध्ये बराच वेळ गेला. महत्त्वाच्या पुलाचे काम वेळेत पूर्ण करणे गरजेचे होते, असे कार्यकर्ता कमलाकर शेणॉय यांनी सांगितले.