जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी आरोपी एका हकीमला अटक केली आहे. बसवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोपावरून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या हल्ल्याप्रकरणी १० दिवसानंतर ही पहिलीच अटक करण्यात आली आहे.
रियासीचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक मोहिता शरम यांनी सांगितले की, रियासी येथे बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एका ४५ वर्षीय हकीमला अटक करण्यात आली आहे. दहशतवाद्यांना हल्ल्यासाठी मदत केल्याबद्दल त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या हल्ल्याचा तो मास्टरमाईंड नाही, परंतु त्याने यामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती.
हे ही वाचा:
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये चकमक, २ दहशतवादी ठार !
संयुक्त राष्ट्र संघाच्या परिषदेत विवान कारुळकर लिखित पुस्तकाचे वितरण
‘आगीत पुस्तके जळू शकतात, परंतु ज्ञान नाही’, पंतप्रधान मोदी!
राज्यातील प्रत्येक तुरुंगातून तयार होणार बुद्धिबळपटू!
अधिकारी पुढे म्हणाल्या की, आरोपी हकीम हा राजौरी येथील रहिवासी आहे. त्याने हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना अन्न पुरवणे, त्यांच्या राहण्याची सोय आणि मार्गदर्शक म्हणून दहशतवाद्यांना घटनास्थळी पोहोचण्यास मदत केली आहे. या प्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाची पुढील चौकशी आणि तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, रियासीमध्ये यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी ९ जून रोजी हल्ला केला होता. या हल्ल्यात १० जणांचा मृत्यू झाला होता तर ३० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. दरम्यान, या प्रकरणाचा तपास आता एनआयएचे पथक करत आहे.