शुक्रवार पासून इंडियन प्रिमियर लीगचा नवा हुंगाम सुरु झाला. सलामीच्या सामन्यात गत विजेता मुंबई इंडियन्स संघ विराट कोहलीच्या बंगलोर संघाला भिडला. अखेरच्या चेंडूपर्यंत चाललेल्या या सामन्यात बंगलोर संघाचा विजय झाला आहे. या विजयासह बंगलोर संघाने आपल्या खात्यात दोन गुण जमा केले आहेत.
आयपीएलच्या या पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकत विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सकडून सलामीला कर्णधार रोहित शर्मा आणि ख्रिस लिन हे दोघे जण उतरले. पण लिनच्या चुकीमुळे धावबाद होत रोहित शर्माला स्वस्तात माघारी परतावे लागले. पुढे सूर्यकुमार यादव आणि ख्रिस लिन या दोघांनी मुंबई संघाचा डाव सावरला. सुर्यकुमारने ३१ धाव केल्या तर लिनचे अर्धशतक १ रनने हुकले. त्यानंतर ईशान किशनने २८ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या जोरावर मुंबई संघाने ९ बाद १५९ धावा केल्या. बंगलोरकडून हर्षल पटेलने ५ विकेट्स घेण्याची अनोखी कामगिरी केली.
हे ही वाचा:
वाझेला न्यायालयीन कोठडी…तळोजा जेलमध्ये रवानगी
पवारांना घरपोच सेवेवरून कोर्टाने ‘लस’ टोचली
ठाकरे सरकारची परिस्थिती ‘नाचता येईना अंगण वाकडे’
१६० धावांचे विजयी लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या बंगलोर संघाच्या सुरवातीच्या दोन विकेट्स लवकर गेल्या पण त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी बंगलोर संघाचा डाव सावरला. सलामीला आलेल्या कोहलीने ३३ धावा केल्या तर मॅक्सवेलने ३९ धावा कुटल्या. हे दोघेही बाद झाल्यानंतर ए.बी.डिव्हिलियर्स याने तुफान फटकेबाजी करत बंगलोर संघाला विजयापर्यंत पोहोचवले. तरीही शेवटच्या षटकात तो धावबाद झाल्यानंतर मुंबई संघ सामन्यात वापसी करण्याची चिन्ह निर्माण झाली होती. शेवटच्या चेंडूपर्यंत ताणलेला हा सामना सुपर ओव्हरमध्ये जाण्याचीही चिन्ह होती. शेवटच्या चेंडूवर बंगलोर संघाला १ धाव आवश्यक होती. ती अगदी सहज काढत बंगलोर संघाने २ गडी राखून मुंबई संघावर मात केली. आपल्या अफलातून गोलंदाजीसाठी हर्षल पटेल याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.