रवी दहिया या कुस्तीपटूने बुधवारी ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. रवी दहिया हा हरियाणामधील नाहरी या छोट्या गावातील खेळाडू आहे. नाहरी हे गाव सोनीपत शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असून या गावात चोवीस तास वीज आणि पिण्यायोग्य पाण्याची अद्यापही सोय नाही.
रवीने ऑलिम्पिकमध्ये पदक निश्चिती केल्यावर रवीच्या वडिलांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की, “आतातरी गावातील वीजेची समस्या दूर होईल आणि पिण्याचे पाणीही मिळेल.”
नाहरी गावातील पंधरा हजार लोक रवीच्या यशासाठी प्रार्थना करत आहेत. रवीचे ऑलिम्पिक पदक गावात सोयीसुविधा आणेल, अशी आशा संपूर्ण गावाला आहे. २०१९ मध्ये रवी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला तेव्हापासूनच संपूर्ण गावात जल्लोषाचे वातावरण आहे. ‘रवीचे पदक हे संपूर्ण गावासाठी चोवीस तास वीज आणि चांगले रस्ते आणेल; गावाचा विकास होईल, अशी आशा आहे. माझ्या मुलाच्या यशाबद्दल मला आनंद आहे आणि तो सुवर्णपदकच घरी घेऊन येईल, अशी मला खात्री आहे.’ असे मत रवीचे वडील राकेश यांनी व्यक्त केले. सध्या जिल्हा प्रशासनाने विशेष व्यवस्था करून नाहरी गावात फक्त रवीच्या मॅचेस गावकऱ्यांना पाहता याव्यात म्हणून वीज सुरू केली आहे.
हे ही वाचा:
कोरोनाची लाट ओसरल्यामुळे नोकर’भरती’ला उधाण
बापरे !! ठाण्यात दोन कथित पत्रकारासह तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा
…तर मुख्यमंत्री उद्या कदाचित गेट वे ऑफ इंडियाचंसुद्धा लोकार्पण करतील
पोलिस कुटुंबियांना पाठवलेल्या नोटीसा रद्द करा
आसामची बॉक्सर लवलिना बोर्गोहेन हिने पदक जिंकल्यावर आसाम सरकारने तिच्या गावात सिमेंटचे रस्ते बांधण्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे रवीने पदक जिंकल्यानंतर आपल्या गावातही विकासकामे होतील, अशी अपेक्षा सर्व गावकऱ्यांना आहे.
वडील करत असत ४० किमी प्रवास
रवीचे वडील राकेश हे एक सामान्य शेतकरी असून; रवी आणि त्याच्या लहान भावाला रोज ताजे दूध, लोणी, दही मिळावे यासाठी ते दररोज ४० किमी प्रवास करायचे. ‘प्रत्येक वडील आपल्या मुलांसाठी काहीना काही त्याग करत असतात. मी काहीही वेगळं केलेलं नाही. आपल्या देशासाठी ते इतकी मेहनत घेत असताना त्यांच्याकडे लक्ष देण हे माझं कर्तव्यच आहे.’ असे मत राकेश यांनी व्यक्त केले.