अखेरच्या दोन चेंडूंत जाडेजाने गुजरातला सीमापार फेकत चेन्नईला दिला आयपीएल चषक

गुजरात टायटन्सचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले

अखेरच्या दोन चेंडूंत जाडेजाने गुजरातला सीमापार फेकत चेन्नईला दिला आयपीएल चषक

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सवर ५ विकेट्सनी मात करत इंडियन प्रीमियर लीगचे विजेतेपद जिंकले. चेन्नईने आपल्या आयपीएलच्या प्रवासात हे पाचवे विजेतेपद पटकाविले. या रंगतदार सामन्यातील विजयाचा शिल्पकार ठरला रवींद्र जाडेजा.

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात  अखेरच्या षटकात चेन्नईला १४ धावांची गरज होती. त्यात मोहित शर्माच्या पहिल्या चेंडूवर शिवम दुबेला एकही धाव काढता आली नाही. दुसऱ्या चेंडूवर एक धाव काढली आणि सामन्यातील धाकधूक वाढली. ४ चेंडूंत १२ धावांची गरज होती. रवींद्र जाडेजा मैदानात उतरलेला होता. जाडेजाने एक धाव काढली. तर चौथ्या चेंडूवर दुबेला एक धाव काढण्याचीच संधी मिळाली.

अर्थात शेवटच्या दोन चेंडूंत १० धावांची गरज होती. जाडेजाने या दोन्ही चेंडूंवर आपला सर्व अनुभव पणाला लावत पहिल्या चेंडूवर षटकार आणि अखेरच्या चेंडूवर जिंकण्यासाठी चार धावा हव्या असताना चौकार लगावत सामन्यात रोमहर्षक विजय मिळविला. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला त्याच्या २५०व्या सामन्यात विजेतेपदाची भेट जाडेजाने दिली. जाडेजाने ६ चेंडूंत १५ धावांची खेळी केली. त्यातला एक षटकार आणि एक चौकार हेच विजयासाठी आवश्यक ठरले.

चेन्नई सुपर किंग्जचे हे पाचवे आयपीएल विजेतेपद ठरले. पावसामुळे २८ मे रोजी सामना होऊ शकला नव्हता. त्यावेळी राखीव दिवशी सामना होईल हे जाहीर झाले. पण जर तेव्हाही सामना झाला नाही तर मात्र गुजरात टायटन्स जिंकतील अशा अटकळी बांधल्या जात होत्या. मात्र चेन्नईने त्यांचे आपल्या घरच्या मैदानावर सामना आणि आयपीएल जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. हार्दिक पंड्याच्या संघाला रिकाम्या हाताने परतावे लागले. २८ मे रोजी पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही मात्र नंतर राखीव दिवशी प्रेक्षकांना रोमहर्षक सामना पाहायला मिळाला.

हे ही वाचा:

उद्धवजी तुम्ही दिलेली मुदत संपली, आता…?

१७०० कोटींच्या घोटाळ्याशी उद्धव ठाकरेंचा काय संबंध?

बहीणभाऊ बुडाल्याचे कुत्र्याच्या भुंकण्यामुळे झाले उघड

३५०व्या शिवराज्याभिषेकानिमित्त संगीतमय शिवस्वराज्यगाथा

त्याआधी, साई सुदर्शनच्या ९६ धावांची झंझावाती खेळी आणि सलामीवीर वृद्धिमान साहाच्या ५४ धावा याच्या जोरावर गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जपुढे ४ बाद २१४ धावा केल्या. त्यानंतर मात्र पाऊस पडल्याने नवे लक्ष्य देण्यात आले. त्यात १५ षटकांत चेन्नईला १७१ धावा करायच्या होत्या.

नाणेफेक चेन्नईने जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. गुजरातने चांगली सुरुवात केली. त्यांच्या साहा आणि शुभमन जोडीने पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. त्यानंतर वृद्धिमानने सुदर्शनसह अर्धशतकी भागीदारी केली. त्यामुळे १४ षटकांत गुजरातने १३१ धावांपर्यंत मजल मारली होती. नंतर साई सुदर्शनने आणि हार्दिक पंड्यासह तिसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी रचल्यामुळे गुजरातला दोनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. चेन्नईची गोलंदाजी फारशी प्रभावी ठरली नाही.

मतिशा पथीराणाने ४ षटकांत २ बळी घेतले. तुषार देशपांडे महागडा गोलंदाज ठरला. त्याने चार षटकांत ५६ धावा दिल्या.

स्कोअरबोर्ड :  गुजरात टायटन्स ४ बाद २१४ (साई सुदर्शन ९६, शुभमन गिल ३९, वृद्धिमान साहा ५४, हार्दिक पंड्या ना. २१, पथीराणा ४४-२) पराभूत वि. चेन्नई सुपरकिंग्ज डीआरएसप्रमाणे १७१चे लक्ष्य (ऋतुराज गायकवाड २६, कॉनवे ४७, शिवम दुबे ना. ३२, अजिंक्य रहाणे २७, अंबटी रायुडू १९, रवींद्र जाडेजा ना. १५, मोहित शर्मा ३६-३)

Exit mobile version