बहुचर्चित इंडियन प्रिमियम लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धेसंबंधी नवी माहिती समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्स या संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीकडे सोपविण्यात आले आहे. आयपीएलचा सीझन सुरू होण्यापूर्वी चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाकडे चेन्नईचे नेतृत्व सोपविण्यात आले होते. त्यानंतर जडेजाने संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा माजी कर्णधार धोनीच्या हाती सोपवले आहे. चेन्नई संघाकडून शनिवार, ३० एप्रिल रोजी यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली.
Jadeja to handover CSK captaincy back to MS Dhoni:Ravindra Jadeja has decided to relinquish captaincy to focus and concentrate more on his game & has requested MS Dhoni to lead CSK. MS Dhoni has accepted to lead CSK in the larger interest & to allow Jadeja to focus on his game.
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 30, 2022
स्वतःच्या खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी जडेजाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. आयपीएलचा हा हंगाम सुरु होण्यापूर्वीच चेन्नईचे नेतृत्व रवींद्र जडेजा करेल, अशी घोषणा चेन्नईच्या संघाकडून करण्यात आली होती. त्यानंतर रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखली चेन्नईच्या संघाला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही.
त्याचबरोबर रवींद्र जडेजाच्या वैयक्तिक कामगिरीवरही परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आपली कामगिरी चांगली व्हावी आणि संघाच्या विजयात आपलेही योगदान असावे, यासाठी जडेजाने यावेळी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे. ८ सामन्यांत जडेजाला २२.४०च्या सरासरीने ११२ धावा करता आल्या आहेत आणि २१३ धावा देत त्याने ५ विकेट्स घेतल्या आहेत.
हे ही वाचा:
अभिनेत्री प्रेमा किरण काळाच्या पडद्याआड
दरम्यान, दुसरीकडे धोनीला यंदाच्या आयपीएलमध्ये सूर गावसल्याचे चित्र आहे. धोनी हा कर्णधार नसला तरी तोच संघातील खेळाडूंना मार्गदर्शन करत असल्याचे पाहायला मिळत होते. धोनी हा पूर्वीसारखा फिनिशरची भूमिका बजावत असल्याचे पाहायला मिळत होते.
चेन्नईच्या संघाने आतापर्यंत आयपीएलमध्ये ८ सामने खेळले आहेत. या ८ सामन्यांमध्ये जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाला २ सामनेच जिंकता आले आहेत. त्यामुळे चेन्नईच्या खात्यामध्ये चार गुण आहेत. आज, १ मे रोजी चेन्नईचा सामना हैदराबादसोबत होणार असून आता पुढे धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.