भाजपा नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्री पदावर वर्णी लागताच भाजपा प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती जवळपास निश्चित झाली आहे. पण, ही नियुक्ती लगेच की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एप्रिलमधील निवडणुकीनंतर होणार? हे अजूनही निश्चित झालेले नाही.
रवींद्र चव्हाण हे एकनाथ शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. डोंबिवलीतून ते चौथ्यांदा विजयी झाले आहेत. फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळात त्यांना स्थान मिळेल अशी चर्चा होती. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही. तर चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली असून महसूलमंत्रिपद देण्यात आले. मंत्रिमंडळ विस्तार होण्यापूर्वीच चव्हाण यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत होते.
हे ही वाचा :
दुमजली इमारतीला लागलेल्या आगीत चार कामगार जखमी
डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार होणार
मुंबईत सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या तरुणाची आत्महत्या
कुर्ल्याप्रमाणे घाटकोपर मध्ये भरधाव टेम्पो बाजारात घुसला
दरम्यान, भाजपचे १२ जानेवारीला शिर्डीत अधिवेशन होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अधिवेशनात चव्हाण यांच्या नावाची घोषणा होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
जानेवारी महिन्यात चव्हाण यांची नियुक्ती केली, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी त्यांना वेळ मिळेल, अशी चर्चा आहे. तसेच बावनकुळे यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवावे, अशीही चर्चा आहे.