टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेमध्ये भारताचे आणखीन एक पदक निश्चित झाले आहे. पुरुषांच्या फ्री स्टाईल कुस्ती या प्रकारात ५७ किलो वजनी गटात भारताचा कुस्तीपटू रवी कुमार दहिया याने अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीच्या सामान्यात कझाकस्तानच्या कुस्तीपटूला चिट पट करत भारताने अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले आहे.
उपांत्य फेरीच्या सामन्यात रवी कुमार दहिया याची लढत कझाकस्तानच्या नूरीस्लाम सानायेव या कुस्तीपटू सोबत होती. सुरुवातीपासूनच हा सामना अटीतटीचा होताना दिसत होता. ज्यामध्ये सुरुवातीला कझाकस्तानच्या खेळाडूने १‐० ची बढत घेतली. पण रवी दहिया याने नंतर अप्रतिम खेळाचे सादरिकरण करत २-१ अशी आघाडी मिळवली. सामन्याची पहिली तीन मिनिटे संपली तेव्हा रवी कुमारकडे एका गुणाची बढत होती.
हे ही वाचा:
पूरग्रस्तांना ११,५०० नाही, तर केवळ १५०० कोटींची तातडीची मदत
खावाले काळ, नी भूईले भार हे ठाकरे सरकार
मनसुख हिरेनच्या हत्येसाठी दिली होती ४५ लाखांची सुपारी
शिवसेनेने मदतीचे चेक परत घेऊन दाखवले
पण सामन्याचा उत्तरार्ध सुरू झाला तेव्हा कझाकस्तानच्या खेळाडूने आक्रमण करत आठ गुणांची कमाई केली. ज्यामुळे सामन्याचे गुण ९-२ झाले. सामना संपायला २ मिनीटांपेक्षाही कमी वेळ शिल्लक होता आणि कझाकस्तानच्या खेळाडूकडे ७ गुणांची आघाडी होती. पण भारताच्या रवी दहियाने हार मानली नाही. त्याने आक्रमक खेळ करत सुरूवातीला ३ गुणांची कमाई करत ९-५ अशी गुणसंख्या केली. तर त्यानंतर आणखीन २ गुण घेतले.
अखेर सामना संपायला काही सेकंद शिल्लक असताना रवी दहियाने आपल्या प्रतिस्पर्ध्याला चीत पट करत अंतिम फेरीतले स्थान निश्चित केले. या विजयामुळे भारताचे टोकियो ऑलिम्पिक मधील आणखीन एक पदक निश्चित झाले आहे आणि ते सुवर्ण पदक असावे अशीट सर्व भारतीयांची प्रार्थना आहे.
पण त्याचवेळी ८६ किलो वजनी गटात मात्र भारताचा कुस्तीपटू दीपक पुनिया याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अमेरिकेच्या डेव्हिड टेलर याने सामन्याच्या अवघ्या काही मिनिटांमध्ये १० गुण मिळवत १०-० फरकाने सामना खिशात घातला. पण तरीही अजून दीपकचे स्पर्धेतील चव्हाण कायम असून तो कांस्य पदक जिंकू शकतो.