आयसीसी टी २० आंतरराष्ट्रीय गोलंदाजांच्या क्रमवारीत नव्या भारतीय खेळाडूची वर्णी लागली आहे. यामुळे जागतिक क्रमवारीत एक नवा गोलंदाज मिळाला आहे. भारतीय फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई आता आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत गोलंदाजीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. रवि बिश्नोईने गेल्या अनेक महिन्यांपासून प्रथम स्थानावर विराजमान असलेल्या राशिद खानला पाठी टाकत ही कामगिरी केली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा रवी बिश्नोईला खूप फायदा झाला. मालिकेत बिश्नोईने शानदार गोलंदाजी करत 5 सामन्यात 9 विकेट घेतल्या होत्या. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ म्हणून देखील गौरवण्यात आलं होतं.
रवी बिश्नोई याने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. फेब्रुवारी २०२३ मध्ये ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना तो खेळला होता. पहिल्याच सामन्यात तो ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला होता. त्याने १७ धावा देऊन दोन बळी घेतले. तेव्हापासून रवी टी- २० मध्ये सातत्याने सर्वोत्तम कामगिरी करत आहे. रवीने आतापर्यंत २१ सामने खेळले असून १७.३८ च्या गोलंदाजीची सरासरी आणि ७.१४ च्या इकॉनॉमी रेटने एकूण ३४ बळी घेतले आहेत. त्याचा गोलंदाजीचा स्ट्राईक रेट १४.५ इतका आहे.
हे ही वाचा
खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग रोडेच्या मृत्यूनंतर त्याचा साथीदार परमजीत सिंग उर्फ धाडीला अटक!
ठाकरेंचा विरोध की अदाणी परत या…ची हाळी
उद्धव ठाकरे आणखी किती रडारड करणार?
‘सीआयडी’ अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन!
रवी बिश्नोईच्या खात्यात आता ६९९ गुण आहेत. या यादीत राशिद खान (६९२) दुसऱ्या स्थानावर आहे. तर, श्रीलंकेचा वानिधू हसरंगा (६७९) तिसऱ्या क्रमांकावर, आदिल रशीद (६७९) चौथ्या क्रमांकावर आणि महिश तिक्षणा (६७७) पाचव्या स्थानावर आहे. म्हणजेच टी- २० आंतरराष्ट्रीय गोलंदाजांच्या क्रमवारीत फिरकीपटू अव्वल पाच स्थानांवर आहेत.