तीन महिने तरी टोमॅटोचे दर चढेच राहणार

टोमॅटोचे उत्पादन होण्यास आणि त्याच्या किमती स्थिर होण्यास तीन महिन्यांचा कालावधी लागेल

तीन महिने तरी टोमॅटोचे दर चढेच राहणार

पावसाला दोष द्या किंवा अपुऱ्या पुरवठ्याला… मात्र भाज्यांच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात टोमॅटोने कहर केल्यामुळे गृहिणींचे बजेटच कोलमडले आहे. मात्र टोमॅटोचे दर तीन महिने तर चढेच राहतील, असे सरकारचे म्हणणे आहे. मंगळवारी मुंबईतील काही भागांत टोमॅटो १६०रुपये किलोने विकले गेले. तर, अंधेरीतील लोखंडवाला, नवी मुंबईतील नेरूळ आणि ठाण्यातील कळवा येथे १२० रुपये किलो प्रमाणे टोमॅटो विकले जात होते. छोटे, सुकलेले किंवा थोडे पिवळसर असलेले टोमॅटोही १२० रुपये किलोने मिळत होते.

दररोजच्या भाजीसोबत कोथिंबीर देणे तर विक्रेत्यांनी केव्हाच थांबवले आहे. आता तर हिरव्या मिरचीचे दरही वाढू लागले आहेत. एरवी १०० रुपये किलो दराने मिळणाऱ्या हिरवी मिरचीचे दरही ३०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. तर, २० ते ४० रुपयांना मिळणारी कोथिंबिरीची जुडी थेट ६० ते १०० रुपयांना मिळू लागली आहे.

‘कोथिंबीर ३५० रुपये किलो दराने मिळू लागली आहे. माझ्या जवळच्या पोळी भाजी केंद्रात कोथिंबिरी वडी हातोहात विकली जाते. मात्र सध्या त्यांच्या मेनूतून ती गायब झाली आहे,’ असे ठाण्यातील एका रहिवाशाने सांगितले. याबाबत कृषीराज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ते त्यांच्या मूळ गावी औरंगाबाद येथे गेले होते. तर, राज्यांतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितींवर देखरेख ठेवणारा कृषी विपणन विभागाचा कार्यभार हा मुख्यमंत्र्यांकडे आहे.

‘मार्च आणि एप्रिलमध्ये टोमॅटोचे पीक खूप वाढल्याने शेतकऱ्यांना त्यांचा माल अतिशय कमी किमतीत विकावा लागला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांवर टोमॅटो रस्त्यांवर फेकून देण्याची वेळ आली होती. या शेतकऱ्यांचा उत्पादनखर्चही तेव्हा निघाला नव्हता. त्यानंतर अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळ आले आणि उभे पीक आडवे झाले. महाराष्ट्रात सुमारे ५६ हजार हेक्टर जमिनीवर टोमॅटोचे पीक घेतले जाते. त्यातून सुमारे १० ते ११ लाख मेट्रिक टन टोमॅटोचे उत्पादन होते. मात्र यंदा टंचाई आहे. टोमॅटोचे उत्पादन होण्यास आणि त्याच्या किमती स्थिर होण्यास तीन महिन्यांचा कालावधी लागेल,’ अशी महिती राज्याच्या कृषी विभागाचे आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली.

हे ही वाचा:

शस्त्रे लुटण्यासाठी आलेल्या जमावाला लष्कराने रोखले; एक ठार

पाकिस्तानची ‘सीमा’ अखेर गेली भारताच्या तुरुंगात

वेस्ट इंडीजला पराभूत करणाऱ्या झिम्बाब्वेचेही आव्हान संपुष्टात

अफगाणिस्तानमधील महिलांचे ब्युटी सलून बंद होणार

एपीएमसीचे संचालक शंकर पिंगळे यांनी टोमॅटोचे दर १०० ते ११० रुपये किलो असल्याचे सांगितले. तर, माटुंग्यातील व्यापारी रोहित केसरवाणी आणि खारमधील किरकोऱळ विक्रेते राजा पाटील यांनी टोमॅटोच्या किमती १६० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याचे सांगितले. ‘मंगळवारी, मी वाशीमधून १४० रुपये किलो दराने टोमॅटोची खरेदी केली. बुधवारी हाच दर १६० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर २०० रुपयांपर्यंत पोहोचतील,’ असे केसरवाणी यांनी सांगितले. तर, वांद्र्याचे विक्रेते जीतू जयस्वाल यांनीही हा काही दिवसांचा प्रश्न आहे, असे म्हटले.

‘सरकारने या प्रश्नी मध्यस्थी करून शेतकरी, घाऊक बाजार आणि किरकोळ विक्रेत्यांमधील दरामध्ये नियमन करावे,’ अशी अपेक्षा खारमधील रहिवाशी सनी पुंजवानी यांनी व्यक्त केली. सन २०१३मध्ये जेव्हा भाज्यांचे दर १०० रुपये किलोपर्यंत पोहोचले होते, तेव्हा राज्याच्या कृषी विभागाने अपना बाजार आणि अन्य सहकारी संस्थांच्या दुकानांमध्ये वाजवी किमतीत भाज्या ठेवल्या होत्या.   याच दरम्यान केंद्र सरकारने ‘टोमॅटो ग्रँड चॅलेंज हॅकेथॉन’ मोहीम सुरू केली आहे. त्यामध्ये टोमॅटोचे दर कमी करण्यासाठी लोकांना तसेच, विद्यार्थी, रिसर्च स्कॉलर्स, प्राध्यापक, उद्योग, स्टार्ट अप्स, लघुउद्योजक, व्यावसायिकांना उपाय सुचवण्याचे आवाहन केले आहे.

Exit mobile version