मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकिटासाठी मोजा इतके रुपये

मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकिटासाठी मोजा इतके रुपये

मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात वाढ केली आहे. मध्य रेल्वेकडून ही दरवाढ १५ दिवसांसाठी करण्यात आली आहे. अलार्म चेन पुलिंगच्या घटना कमी व्हाव्यात यासाठी मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. वाढीव दर हे सोमवार, ९ मे २०२२ पासून सुरू होणार आहेत.

एप्रिल महिन्यात मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांवर अलार्म चेन पुलिंगच्या (आपत्कालीन साखळी) ३३२ घटना घडल्या आहेत. यामध्ये बऱ्याच घटना या कारण नसताना घडल्या आहेत. याचा परिणाम एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर पडला असून एप्रिल महिन्यात अनेक एक्स्प्रेस रेल्वे उशिरा धावल्या. यामुळे रेल्वेतील इतर सर्व प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. ही बाब लक्षात घेऊन अलार्म चेन पुलींगच्या घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वेनं रेल्वे प्लॅट फॉर्म तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार ९ मे २०२२ पासून २३ मे २०२२ दरम्यानच्या १५ दिवसांसाठी दरवाढ केली आहे. त्यामुळे आता मुंबईतील सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या रेल्वे स्थानकांत प्लॅटफॉर्म तिकीटांची किंमत १० रुपयांऐवजी ५० रुपये इतकी असणार आहे.

हे ही वाचा:

नांदेडमधून १० तलवारी जप्त; एकाला अटक

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

तारापूरमध्ये स्टील कारखान्याच्या कामगारांवर जमावाचा हल्ला, १९ पोलीस जखमी

कुमार विश्वास यांनी देशातील जनतेला दिली एक गंभीर वॉर्निंग

शिवाजी सुतार यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, एप्रिल महिन्यात अलार्म चेन पुलिंगच्या ३३२ घटना घडल्या असून केवळ ५३ घटना या योग्य कारणासाठी घडल्या आहेत. तर २७९ प्रकरणांत आरोपींनी कोणतंही कारण नसताना रेल्वेची आपत्कालीन साखळी ओढली आहे. अशा आरोपींकडून आतापर्यंत ९४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Exit mobile version