प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या जीवनपैलूंचा लवकरच उलगडा जगासमोर होणार आहे. एका पुस्तकातून रतन टाटा यांच्या जीवनाचा प्रवास वाचकांच्या भेटीला येणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्था ‘हार्पर कॉलिन्स’ ही टाटांचे चरित्र प्रकाशित करणार आहे. ‘मिंट’च्या वृत्तानुसार हार्पर कॉलिन्सने ग्लोबल प्रिंट राईट्स, ऑडियो बुक राईट्स आणि ई- बुकचे प्रकाशन हक्क तब्बल २ कोटी रुपयांना खरेदी केले आहेत.
रतन टाटा यांच्या जीवनातील गुपिते, करिअरचा प्रवास, टाटा समूहासोबतच्या प्रवासाचा उलगडा या पुस्तकातून होणार आहे. रतन टाटा यांच्या पुस्तकासाठी केवळ उद्योगजगतच नाही तर सामान्य वाचकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. हार्पर कॉलिन्सने या आत्मचरित्रासाठी जागतिक स्वामित्व हक्क मिळविले आहे. तर माजी सनदी अधिकारी थॉमस मॅथ्यू टाटांचा जीवनप्रवास शब्दबद्ध करणार आहेत. आजवरच्या जगातील महागड्या लेखन करारांमध्ये टाटांच्या चरित्राचा समावेश होण्याची शक्यता आहे.
पुस्तकाच्या निर्मितीला सुरुवात झाली असून प्राथमिक स्वरुपाच्या संशोधनासाठी कागदपत्रे, पुस्तके यांचा अभ्यास सुरू झाला आहे. तसेच जगाला माहिती नसलेले रतन टाटा यांचे पैलू जाणून घेण्यासाठी त्यांच्या जवळच्या व्यक्तींसोबत चर्चा केली जात आहे. रतन टाटा यांच्याशी प्रत्यक्ष संवादावर लेखक मॅथ्यू यांचा भर असून ते सतत टाटांसोबत चर्चा करत आहेत.
हे ही वाचा:
उपाहारगृहे, हॉटेल्स, नाट्यगृहे, मॉल यांच्यावर आता हे नवे निर्बंध
… म्हणून पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा रद्द
‘या’ दिवशी होणार ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
रतन टाटांचे आत्मचरित्र केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रकाशित केले जाणार आहे. त्यामुळे इंग्रजीसोबतच अन्य भाषेत पुस्तक छापले जाणार आहे. तर येत्या नोव्हेंबर महिन्यात टाटांचे पुस्तक वाचकांच्या भेटीस येण्याची शक्यता आहे.