टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष रतन टाटा जितके मोठे उद्योगपती आहेत, तितकेच त्यांचे हृदयही विशाल आहे. त्यांना श्वानप्रेमी म्हणूनही ओळखले जाते. आता ते एका श्वानाच्या मालकाचा शोध घेत आहेत. त्यांनी सोशल मीडियावर त्याचे छायाचित्र टाकून एक पोस्ट केली आहे.
रतन टाटा यांनी गुरुवारी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावरून पोस्ट केली. त्यात त्यांनी पट्टा बांधलेल्या एका श्वानाचे छायाचित्र पोस्ट केले आहे. या छायाचित्रातील हा श्वान टाटाच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांना मिळाला आहे. सायन रुग्णालयाच्या जवळ पोहोचलेल्या या श्वानाची देखभाल सध्या रतन टाटा यांच्या कार्यालयातच केली जात आहे. तसेच, त्याच्या मालकाचाही शोध घेतला जात आहे.
‘माझ्या ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना एक वाट चुकलेला श्वान सापडला आहे. आदल्या रात्री सायन रुग्णालयाजवळून त्याला माझ्या ऑफिसला आणण्यात आले. जर तुमच्याजवळ या श्वानाच्या मालकासंदर्भात कोणतीही माहिती असेल तर कृपया reportlostdog@gmail.com वर पाठवावी. सध्या तो आमच्या देखरेखीखाली आहे आणि आम्ही त्याला झालेल्या जखमांवर उपचार करत आहोत,’ अशी पोस्ट टाटा यांनी केली आहे.
रतन टाटा यांना भटक्या कुत्र्यांप्रतिदेखील स्नेह आहे. ते अनेक स्वयंसेवी संस्था आणि ऍनिमल शेल्टर्सना दानही करतात. विशेष म्हणजे रतन टाटा यांचा पाळीव कुत्रा ‘गोवा’ हादेखील कधीकाळी भटका श्वान होता. जो त्यांना गोव्यात भटकताना दिसला होता. आता तो प्रत्येक क्षणी रतन टाटांसोबत त्यांच्या घरात राहतो.
हे ही वाचा:
कुख्यात गुंड आतिकच्या भावाच्या बेनामी संपत्तीची रहस्ये उलगडली
तरुणाने आत्महत्येचे पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्याला हेरले!
कॅनडामध्ये प्रवेश मिळालेले तब्बल छत्तीस हजार विद्यार्थी चिंतेत
हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचे निधन!
पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतरही त्यांनी भटक्या प्राण्यांविषयी चिंता व्यक्त करून वाहनचालकांना आवाहन केले होते. ‘आता मान्सून आला आहे. आता अनेक भटकी मांजरे आणि कुत्री आपल्या गाड्यांखाली आश्रय घेतील. तेव्हा या मांजरांना कोणतीही दुखापत होऊ नये, यासाठी स्वत:ची गाडी चालू करण्याआधी किंवा तिचा वेग वाढवण्याआधी एकवेळ गाडीखाली नक्की पाहा. या गाडीखाली हे प्राणी आहेत, हे तुम्हाला माहीत नसेल तर ते जबर जखमी होऊ शकतात किंवा त्यांचा मृत्यूही होऊ शकतो. हे मन विषण्ण करणारे असेल,’ असे त्यांनी या पोस्टवर लिहिले होते.