स्त्री शक्तीचा जागर: राष्ट्र सेविका केळकर मावशी

स्त्री शक्तीचा जागर: राष्ट्र सेविका केळकर मावशी

देशात नवरात्रीचा उत्सव सुरु आहे. भाविक नंदादीप प्रज्ज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करत आहेत. या नऊ दिवसात स्त्री रुपी देवीची नऊ रूपे दिसून येतात. ऊर्जा, शौर्य, नेतृत्व, प्रेरणा, सामर्थ्यशाली अशा नऊ रूपांचे दर्शन घडते. अशाच एका देवी रुपेचे दर्शन घडले आहे, जे एका सामान्य महिलेने प्रेरणा घेत, शौर्य दाखवत, ‘राष्ट्र सेविका समिती’चे नेतृत्व केले. त्या म्हणजे, ‘लक्ष्मीबाई केळकर’ उर्फ वंदनीय ‘केळकर मावशी’.

हजारों वर्षांचे इस्लामी आक्रमण असो वा भारताची फाळणी, महिलांचे अस्तित्व कायम एखाद्या उपभोग्य वस्तूच्या रुपात पाहिले गेले. यामागचे कारण म्हणजे महिलांची दुबळी मानसिक आणि शारीरिक स्थिती आणि नेतृत्वाचा अभाव. अशा वेळी महिलांच्या संघर्षमय जीवनातून सामर्थ्यमय जीवनाकडे घेऊन जाणाऱ्या वंदनीय ‘लक्ष्मीबाई केळकर’ यांनी ‘राष्ट्र सेविका समिती’ स्थापन करून हिंदू स्त्रियांच्या मनात आत्मविश्वास निमार्ण केला. हिंदू स्त्रियांना मातृत्वासाठी जिजाऊ मांसाहेब, कर्तृत्वाकरिता माता अहिल्यादेवी होळकर आणि नेतृत्वासाठी झाशीच्या राणीचा आदर्श ठेवण्याचा संदेश देणाऱ्या लक्ष्मीबाई केळकर यांचे महिला सुरक्षा, स्त्रीशिक्षण, स्त्रीदाक्षिण्य, आणि महिलांच्या संगठनाचे कार्य प्रचंड आहे.

बंगालच्या फाळणी दरम्यान स्वातंत्र्यासैनिकांचा राग प्रचंड उफाळून आला होता, लोकमान्य टिळकांची लेखणी इंग्रजांवर अक्षरशः आग ओकत होती. यादरम्यान नागपुरात ‘कमल’चा जन्म झाला, त्यावेळी कोणाला वाटले असेल की, ही मुलगी भविष्यात मातृ-शक्ती जागरणाची अभूतपूर्व कार्य करणारी संघटना स्थापन करेल. कमलची आई लोकमान्य टिळकांचे केसरी वर्तमानपत्र मोठ्याने वाचत असे, टिळकांचे तेजस्वी विचार कानावर पडणाऱ्या कमलच्या मनात राष्ट्रभक्तीची आग पेटणं हे स्वाभाविक होतं. या विचारांनी प्रभावित झालेल्या कमलने लहानग्या वयात ‘हुंडा न देता लग्न’ होत असेल तरंच करेन वा अविवाहित राहीन असा निश्चय केला होता.

कमल १४ वर्षाच्या झाल्यानंतर त्यांच्या इच्छेप्रमाणे हुंड्याशिवाय त्यांचा विवाह वर्ध्याचे वकील पुरषोत्तम राव केळकर यांच्याशी झाला, पुरषोत्तम राव विधुर होते, त्यांना दोन कन्या होत्या. कमलच्या विवाहानंतर त्यांचे नाव ‘लक्ष्मीबाई केळकर’ झाले. त्या एक आदर्श व जागरूक गृहिणी होत्या, त्यांनी आपल्या मुलींचा सांभाळ मायेने केला, पुढे त्यांना ६ मुलं झाली. टिळकांच्या विचारांनी प्रेरित लक्ष्मीबाई घरात नेहमी स्वदेशीचा आग्रह धरीत असत.

दरम्यान, आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी घरी शिक्षक ठेवणाऱ्या लक्ष्मीबाईंच्या मनात समाजाच्या सर्वच मुलींच्या शिक्षणाचा विचार आला आणि त्यांनी बालिका विद्यालय उघडले. असेच एका सभेत गांधीजी दान मागत असताना लक्ष्मीबाईंनी गळ्यातली सोन्याची साखळी काढून दानपत्रात टाकली होती. १९३२ साली पुरषोत्तम रावांचे निधन झाले. अशा परिस्थितीत त्यांनी संपूर्ण घराची जबाबदारी सांभाळली.

अशा दिवसांतच त्यांची मुलं संघाच्या शाखेत जात असंत, तिथून आल्यानंतर संघात शिकवलेल्या गोष्टी आपल्या लक्ष्मीबाईंना सांगत असत. मुलांच्या विचार आणि व्यवहारात संघाच्या विचारांनी आलेला बदल लक्ष्मीबाईंना भावला आणि त्यांनी संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची भेट घेतली. परंतु, संघात स्त्रिया येत नाहीते हे हेडगेवारांनी समजावून सांगितले. यानंतर लक्ष्मीबाई काहीशा निराश झाल्या. पण त्यांनी संघाच्या विचारांच्या प्रेरणेने महिलांसाठी वर्ष १९३६ साली ‘राष्ट्र सेविका समिती’ची स्थापना केली. समितीच्या कार्यविस्तारासोबत लक्ष्मीजींचा नावाचा प्रचारही झाला. समितीच्या सेविका त्यांना वंदनीय मावशी म्हणत असत. दहा वर्षांत राष्ट्र सेविका समिती देशाच्या कानाकोपऱ्यात पोचली.

हे ही वाचा..

स्त्री शक्तीचा जागर: त्यागाचे रूप माई सावरकर

झाकीर नाईकची व्हिडीओवर संतापाची लाट

मालदीवसाठी भारत सर्वात मोठे पर्यटन स्रोत

बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण, आरोपींवर १० लाखांचं बक्षीस!

फाळणीच्या एका दिवसापूर्वी मावशी सिंधच्या कराची मध्ये होत्या, अशावेळी त्यांनी समितीच्या सेविकांना संघर्षाच्या परिस्थितीचा सामना करण्याची आणि स्वसंरक्षणाची आज्ञा केली. तसेच त्यांनी पाकिस्तानातील जमेल तेवढ्या विस्थापित हिंदूंना भारतात सुखरूप पाठवण्याची व्यवस्थाही केली. आपल्या कार्यविस्तारात त्यांनी बालमंडली, भजनमंडली, योगाभ्यास केंद्र, बालिका छात्रावास अशा अनेक प्रकल्पांची सुरुवात केली. लक्ष्मीबाई उत्तम वक्त्या होत्या, रामायण-महाभारत कथांचे निरूपण करून त्यांनी जो निधी मिळवला त्याचा वापर त्यांनी समिती केंद्रांच्या स्थापनेसाठी केला. २७ नोव्हेंबर १९७८च्या दिवशी नारी जागरणाच्या या अग्रदूत देवीने या जगाचा निरोप घेतला. आजही त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्र सेविका समितीचे काम आज जगभरातल्या २५ देशांत आहे.

Exit mobile version