मुंबईत पाऊस झाल्यानंतर पाण्यामुळे होणाऱ्या खड्ड्यांची समस्या ही दरवर्षीची डोकेदुखी असते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मुंबईतल्या सभेत ही चिंता व्यक्त केली होती. मुंबईकरांना खड्डेमुक्त करण्यासाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले होते. पावसाळ्याच्या आधीच अत्याधुनिक तंत्रज्ञानाने व जलदगतीने हे खड्डे भरण्यात यावेत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्या प्रमाणे आता रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिट आणि रॅपिड अस्फाल्ट या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘रस्ते खड्डेमुक्त’ ठेवण्यात येणार आहेत.
मुंबई महानगर पालिकेने त्यासाठी आधीच तयारी सुरु केली आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी आणि खराब भाग दुरूस्त करण्यासाठी आता पावसाळा पूर्व कामांमध्ये रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिट (एम ६०) आणि रिअॅक्टिव्ह अस्फाल्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या संदर्भात महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी संबंधित विभागाला आदेश दिले आहेत.
हे ही वाचा:
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ठोठावला मुंबई हायकोर्टचा दरवाजा
पंखे थरथरले, भांडी कोसळली .. भूकंपाच्या धक्क्यांनी दिल्ली हादरली
आम आदमी पार्टीने लावले मोदींविरोधातले पोस्टर्स…१०० एफआयआर, ६ अटकेत
खलिस्तान समर्थक अमृतपालने रंगरूप बदलून काढला पळ! नवी माहिती आली समोर
गत वर्षीच्या पावसाळ्यात मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागाने रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिट आणि रिअॅक्टिव्ह अस्फाल्ट या दोन पद्धतीने खड्डे भरण्याचे प्रात्यक्षिक मुंबईच्या रस्त्यांवर केले होते. त्यामध्ये रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिटचा वापर करून खड्डे भरल्यानंतर अवघ्या सहा तासांमध्ये रस्ता वाहतुकीसाठी खुला करणे शक्य झाले होते. त्यामुळे आता पावसाळ्यात रस्ते खड्डे मुक्त रहावेत आणि आगामी गणेशोत्सव विनाअडथळा हा सण पार पडावा यासाठी आतापासूनच महापालिका सज्ज होताना दिसत आहे.
खड्डे विशिष्ट आकारात कापणार आणि बुजवणार
मुंबईमधील खड्डे बुजवण्यासाठी कोल्डमिक्सचा वापर केला जातो. मात्र, त्याच ठिकाणी पुन्हा खड्डे पडत असल्याने ते बुजवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे .नव्या तंत्रज्ञानाने रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी विशिष्ट पद्धतीचा वापर करण्यात येणार आहेत. या पद्धतीमध्ये खड्डे विशिष्ट आकारात कापणे व योग्य तंत्रज्ञानाने भरणे यासारख्या कामांचा समावेश आहे. या कामांचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड तीन वर्षांसाठीचा असणार आहे. त्यामुळे या कालावधीत रस्त्यांवर खड्डे होणार नाहीत, याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असणार आहे.