कोट्यवधी रामभक्त ज्याची गेल्या कित्येक वर्षांपासून आतुरतेने वाट पाहात आहेत, त्या रामलल्लाची मूर्ती अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात गुरुवारी भल्या पहाटे दाखल झाली. ही मूर्ती मंदिर परिसरात क्रेनच्या मदतीने आणण्यात आली.
राम मंदिरात रामाची मूर्ती स्थानापन्न होण्याआधी गर्भगृहात ‘जय श्री राम’च्या नामजपात विशेष पूजा करण्यात आली. श्री राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नरेंद्र मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामलल्लाची मूर्ती गुरुवारीच गर्भगृहात स्थानापन्न केली जाईल. रामलल्लाची मूर्ती मंदिरात ट्रकने आणण्यात आली.
२२ जानेवारी रोजी राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सात दिवसांच्या विधींना सुरुवात झाली आहे. बुधवारी या संदर्भातील ‘कलश पूजन’ करण्यात आले. हे सर्व विधी २१ जानेवारीपर्यंत चालणार आहेत. प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी केवळ ठरावीक आवश्यक रामलल्लाच्या प्राणपतिष्ठेचे विधी केले जातील, अशी माहिती राम मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दिली. हे सर्व विधी १२१ आचार्य करत आहेत. राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठेचा सोहळा सोमवार, २२ जानेवार रोजी दुपारी साडेबारा वाजता सुरू होणार असून तो दुपारी एक वाजेपर्यंत संपेल.
हे ही वाचा:
थलसेना दिवसाचा अमृतमहोत्सव रक्तदान, शस्त्रप्रदर्शनाला गणेश नाईक, समीर वानखेडेंची उपस्थिती
अदानीविरोध करणारी काँग्रेस तेलंगणातील करारानंतर गप्प
अयोध्येला एटीएस कमांडोचे सुरक्षा कडे
हुती गटाच्या हल्ल्याला अमेरिकेकडून जोरदार प्रत्युत्तर!
अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून राजकारणी, उद्योगपती, संत आणि सेलिब्रिटींसह सुमारे सात हजार नागरिक उपस्थित राहणार आहेत. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असतील. तसेच, विविध देशांमधील १०० प्रतिनिधींचीही सोहळ्याला खास उपस्थिती असेल. मंदिरात स्थानापन्न होणारी रामलल्लाची मूर्ती मैसूरूस्थित अरुण योगिराज या मूर्तिकाराने साकारली आहे.