रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या ऐतिहासिक मालिकेत अरुण गोविल आणि माता सीतेच्या भूमिकेत श्रीरामाची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलियाचा वनवास संपला आहे. अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहेत. तब्बल ३५ वर्षांनी ही जोडी पुन्हा इतर दिसणार आहे. अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया यांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. दीपिका चिखलियाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून शूटिंग सुरु असल्याची बातमी दिली आहे.
रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका १९८७ साली दूरदर्शनवर प्रसारित झाली होती. ही मालिका बघण्यासाठी लोकं आपापली कामे उरकून मोकळे व्हायचे. ज्या काळात ही मालिका प्रसारित व्हायची तेव्हा लोक रस्त्यावर क्वचितच दिसायचे. या मालिकेत राम आणि सीतेची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची देवासारखी पूजा केली जायची. कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात ही मालिका पुन्हा एकदा दूरदर्शनवर दाखवली गेली. त्याही वेळी या मालिकेने टीआरपीच्या बाबतीत पुन्हा एकदा विक्रम केला.
छोट्या पडद्यावर आतापर्यंत रामायणावर अनेक मालिका बनवण्यात आल्या आहेत, परंतु १९८७मध्ये प्रसारित झालेल्या रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेची लोकांना वेगळीच क्रेझ होती. या मालिकेत अरुण गोविलने रामाची भूमिका साकारली होती, तर दीपिका चिखलिया सीतेच्या भूमिकेत दिसली होती.
हे ही वाचा:
ग्राहक म्हणून तुमचे हक्क तुम्हाला माहिती आहेत का ?
सावधान महाराष्ट्रात एन्फ्लूएंझा विषाणूचा धोका वाढतोय
अयोध्येच्या राम मंदिरासाठी दणदणीत देणग्या
‘नुक्कड’ फेम समीर खक्कर यांचे रुग्णालयात निधन
हा व्हिडिओ शेअर करत दीपिका चिखलियाने लिहिले, ‘सेटवर.’ व्हिडिओमध्ये दीपिका तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये साडी नेसलेली दिसत आहे, त्यानंतर ती सीरियलच्या सीनचे शूटिंग करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अरुण गोविल आणि दीपिका सोफ्यावर बसून संवाद करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहते खूप आनंदित झाले आहेत. अरुण गोविल आणि दीपिका चिखलियाची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.