रामलल्लाच्या तीन मूर्तींपैकी एका मूर्तीची निवड झाली आहे. कर्नाटकचे सुप्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज यांच्या मूर्तीची निवड अयोध्येतील राममंदिरासाठी झाली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती ‘एक्स’वर दिली.
‘जिथे राम आहे, तिथे हनुमान आहे. अयोध्येत प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी मूर्तीची निवड झाली आहे. आपल्या देशाचे सुप्रसिद्ध मूर्तिकार, आपला गौरव अरुण योगीराज यांनी साकारलेली प्रभू रामाची मूर्ती अयोध्येत विराजमान होणार आहे. हे राम आणि हनुमानाच्या अतूट निष्ठेचे आणखी एक उदाहरण आहे. हनुमानाची भूमी असणाऱ्या कर्नाटकमधून रामलल्लासाठी एक महत्त्वपूर्ण सेवा झाली आहे, यात कोणतीच शंका नाही,’ असे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ‘एक्स’वर नमूद केले आहे.
मूर्तीसाठी मागवले होते १२ दगड
रामलल्लाची मूर्ती साकारण्यासाठी नेपाळच्या गंडकी नदीसह कर्नाटक, राजस्थान आणि ओडिशातून उच्च गुणवत्तेचे दगड ट्रस्टने मागवले होते. या सर्व दगडांची पारख केल्यानंतर राजस्थान आणि कर्नाटकचे दगडच मूर्तीसाठी योग्य मानले गेले.
हे ही वाचा:
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जपान भूकंपाच्या धक्क्याने हादरलं!
बाबरीचे पक्षकार अंसारी म्हणतात, पंतप्रधान मोदींनी अयोध्येचे रुपडे पालटले!
इस्रोकडून भारतीयांना नव्या वर्षाची भेट; XPoSAT चे यशस्वी प्रक्षेपण!
२२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा
शिल्पकारांची परंपरा
३७ वर्षीय अरुण योगीराज हे प्रसिद्ध मूर्तिकार योगीराज शिल्पी यांचे पुत्र आहेत. मैसुरू महलच्या शिल्पकारांच्या कुटुंबाचा ते भाग आहेत. अरुण यांच्या वडिलांनी गायत्री आणि भुवनेश्वर मंदिरासाठीही काम केले आहे. एमबीए शिकलेले योगीराज पाचव्या पिढीतील मूर्तिकार आहेत. एमबीएची पदवी मिळवल्यानंतर त्यांनी एका खासगी कंपनीतही काम केले होते. मात्र सन २००८मध्ये मूर्तिकार बनल्यानंतर त्यांनी नोकरी सोडून दिली.
शंकराचार्यांसह अनेक मूर्ती साकारल्या
केदारनाथमध्ये स्थानापन्न करण्यात आलेल्या शंकराचार्य यांच्या मूर्तीसह योगीराज यांनी म्हैसूरमध्ये महाराजा जयचामराजेंद्र वडेयार यांची १४.५ फूट सफेद संगमरवराची मूर्ती, महाराजा श्री कृष्णराज वाडियार चौथे आणि स्वामी रामकृष्ण परमहंस यांची सफेद संगमरवराची मूर्ती साकारली होती. इंडिया गेटवर बसवण्यात आलेली नेताजी सुभाषचंद्र बोस यांची मूर्तीही योगीराज यांनीच साकारली आहे.