गुरूवार १ एप्रिल रोजी केंद्र सरकारतर्फे मानाच्या अशा दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा करण्यात आली. २०२१ या वर्षातला दादासाहेब फाळके पुरस्कार तमिळ सुपरस्टार रजनीकांत यांना देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या संबंधीची घोषणा केली. दादासाहेब फाळके पुरस्काराचे हे ५१ वे वर्ष आहे.
केंद्रिय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. “मला हे जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे की भारतीय चित्रपट इतिहासातील महान अभिनेत्यांपैकी एक असणाऱ्या रजनीकांत यांना या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. अभिनेता, निर्माता आणि लेखक म्हणून त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.” असे जावडेकरांनी ट्विट केले आहे.
हे ही वाचा:
लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात
पीपीएफ वरील व्याजदरात बदल नाही
या वर्षी दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड करणारे परिक्षक म्हणून जेष्ठ गायिका आशा भोसले, दिग्दर्शक सुभाष घई, मल्याळी सुपरस्टार मोहनलाल, संगीतकार शंकर महादेवन आणि बिस्वजीत चॅटर्जी यांनी काम पाहिले.
रजनीकांत यांना हा पुरस्कार घोषित झाल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत रजनीकांत यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “थलैवा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळणे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे.” असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
Popular across generations, a body of work few can boast of, diverse roles and an endearing personality…that’s Shri @rajinikanth Ji for you.
It is a matter of immense joy that Thalaiva has been conferred with the Dadasaheb Phalke Award. Congratulations to him.
— Narendra Modi (@narendramodi) April 1, 2021
१९७५ साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या रजनीकांत यांनी अल्पावधीतच आपली छाप पाडली. त्यांच्या चित्रपटांना आणि अभिनयाला लोकांनी डोक्यावर उचलून घेतले. गेली ४६ वर्ष त्यांची कारकिर्द अविरत सुरू आहे. आजही राॅबोट, २.०, दरबार, कबाली असे त्यांचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.
या आधी रजनीकांत यांना भारत सरकारच्या पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.