भारतीय नौदलासाठी रविवारचा दिवस दिवस ऐतिहासिक आहे. हिंदी महासागरातील चीनच्या वाढत्या कारवाया रोखण्यासाठी , स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मुरमुगाव’ ही क्षेपणास्त्र विनाशक युद्धनौका आता सज्ज झाली आहे. नौदलात दाखल झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे आयएनएस मुरमुगाव युद्धनौकेला नौदलात समावेश करण्यात आला. राजनाथ सिंह यांनी आयएनएस मुरमुगावच्या सोहळ्याला संबोधित केले. ते म्हणाले की, येणार्या काळात आपण केवळ आपल्या गरजांसाठीच नव्हे तर जगाच्या गरजांसाठी जहाजे बांधणार आहोत.
आयएनएस मुरमुगाव ही भारतातील सर्वात शक्तिशाली युद्धनौकांपैकी एक आहे. यामुळे भारताची सागरी क्षमता वाढेल. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने बांधलेली ही युद्धनौका आपल्या स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षमतेचे उत्तम उदाहरण आहे असेही राजनाथ सिंह म्हणाले . नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी सांगितले की हे यश गेल्या दशकात युद्धनौका डिझाइन आणि बांधकाम क्षमतेमध्ये आपण घेतलेल्या मोठ्या प्रगतीचे द्योतक आहे. नौदलाकडे जहाजांना शहरांच्या नावावर नाव देण्याची परंपरा आहे. त्यामुळे दोघांमध्ये एक चिरस्थायी संबंध निर्माण होतो. स्वदेशी युद्धनौका बांधण्याच्या इतिहासातील आजचा दिवस आणखी एक मैलाचा दगड आहे.
हे ही वाचा:
उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल
‘अरुणाचलच्या तवांगमध्ये धर्मांतरणाविरोधात लढणारा सैनिक म्हणजे तेची गुबीन’
या भव्य युद्धनौकेची लांबी १६३ मीटर, रुंदी १७ मीटर आणि वजन ७४०० टन आहे. भारताने बांधलेल्या सर्वात घातक युद्धनौकांमध्ये याची गणना केली जाऊ शकते. जहाज चार शक्तिशाली गॅस टर्बाइनद्वारे चालवले जाते. आयएनएस मुरमुगाव ३० नॉट्सपर्यंतचा वेग गाठू शकते. कोणतेही रडार हे जहाज सहजपणे शोधू शकत नाही. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आयएनएस मुरमुगाव ब्रह्मोस आणि बराक-८सारख्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. याशिवाय इस्रायलचे मल्टी फंक्शन सर्व्हिलन्स थ्रेट अलर्ट रडार ‘एमएफ -स्टार ‘ देखील आयएनएस मुरमुगावमध्ये स्थापित करण्यात आले आहे. जे हवेतच लांब अंतरावरील लक्ष्य शोधते.