ब्रिटनमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहात आहेत. लिस्टर इस्टमधून राजेश अग्रवाल हे मजूर पक्षाकडून निवडणूक लढवत असून ते मूळचे भारतीय वंशाचे आहेत. त्यांनी मतदारांशी सुसंवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत आणि आता या विभागातून खासदार म्हणून जिंकून येण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना स्थानिक पातळीवर उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
या संदर्भात एका वृत्तवाहिनीशी बोलताना अग्रवाल म्हणाले, आपण लिस्टर इस्टमध्ये बऱ्याच वर्षांपासून राहात आहोत. माझा जन्म आणि संगोपन हे भारतात झाले. ब्रिटनमधील सर्वाधिक भारतीय हे लिस्टर इस्टमध्ये राहतात. त्यातील अनेक लोक हे इथे आलेल्या पहिल्या किंवा दुसऱ्या पिढीतील आहेत. मीदेखील त्यातलाच एक आहे. त्यामुळेच मी लिस्टर ईस्टमधून निवडणूक लढविण्याचे ठरविले.
हेही वाचा..
‘नव्या संकल्पासह काम करेल १८ वी लोकसभा’
दागेस्तानमध्ये दहशतवाद्यांचा सिनेगॉग, चर्चवर हल्ला!
नेमबाजीतला गोल्डन बॉय अवनीश पाटील
भाजपा आमदार मंगेश चव्हाणना धमकी देणाऱ्या जोर्वेकरांविरोधात आंदोलन!
ते म्हणाले, मी अनेक लोकांशी बोललो आहे, पण मी बाहेरचा आहे, अशी शंकाही कुणाच्या मनात आलेली नाही. लोकांना एक सक्षम खासदार हवा आहे. लिस्टरमधील लोक हे विशाल हृदयाचे आहेत. त्यामुळे ते तुम्ही बाहेरून आलात असा सवाल विचारणार नाहीत, याची मला खात्री आहे. त्यांनी आपल्या विजयाबद्दल खात्री दिली. ते म्हणाले की, अर्थात, इथून निवडणूक लढवताना अनेक आव्हाने आहेत, यात शंका नाही. लोकांना आता राष्ट्रीय स्तरावर बदल हवा आहे. मी लोकांशी संवाद साधतो तेव्हा हे मला जाणवते. लोकांना हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळत नाही, डॉक्टरांकडे प्रवेश मिळत नाही, बेरोजगारी वाढलेली आहे. लिस्टर इस्टमधील जवळपास ५० टक्के मुले ही गरिबीत राहात आहेत. एकूणच देशात ज्या पद्धतीने समस्यांना लोक सामोरे जात आहेत, त्याच समस्यांना लिस्टर इस्टमधील लोकांनाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे इथे लोकांना मोठा बदल हवा आहे.
राजेश अग्रवाल हे या पूर्वी लंडनचे उपमहापौर म्हणून त्यांनी काम केले आहे. या निवडणुकीसाठी त्यांची मजूर पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी उपमहापौर पदाचा राजीनामा दिला आहे. याबद्दल अग्रवाल म्हणाले, या देशाने मला संधी दिली आणि मेहनत आणि चिकाटीने मी चांगली कामगिरी केली. पृथ्वीवरील सर्वात मोठ्या शहरांपैकी एका शहराचा उपमहापौर म्हणून सेवा करण्याचा बहुमान मिळेल याची मी कल्पनाही केली नव्हती. त्यासाठी मी सदैव ऋणी राहीन.