आयपीएल हंगामात दिल्लीने सलग दुसऱ्या पराभवाची तर राजस्थानने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. राजस्थानचा संघ चार गुणांसह आणि ०.८०० रनरेटसह गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी आहे. तर, दिल्ली आठव्या स्थानी आहे. दिल्ली आणि मुंबईला आतापर्यंत एकही विजय मिळवता आलेला नाही. कर्णधार संजू सॅमसन याच्या राजस्थान संघाने दिल्लीला १२ धावांनी पराभूत केले. राजस्थानने २० षटकांत पाच विकेट गमावून १८५ धावांचे लक्ष्य दिल्लीला दिले होते. मात्र दिल्ली २० षटकांत पाच विकेट गमावून केवळ १७३ धावाच करू शकली.
दिल्लीची चांगली सुरुवात झाली होती. डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्शल यांच्या दरम्यान पहिल्या विकेटसाठी ३० धावांची भागीदारी झाली. ही जोडी बर्गरने चौथ्या षटकात फोडली. मार्शने १२ चेंडूंमध्ये पाच चौकारांसह २३ धावा केल्या. त्यानंतर रिकी भुई याला बर्गर याने बाद केले. तीन चेंडूंत त्याने दोन विकेट घेतल्या. भुई शून्यावर बाद झाला. दिल्लीची दोन बाद ३० अशी अवस्था झाली होती. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि ऋषभ पंत यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. वॉर्नरने ३४ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांसह ४९ धावा केल्या. तर, कर्णधार पंतने २८ धावा केल्या. चहलने त्याची विकेट घेतली. त्यानंतर दिल्लीचा धावफलक १२२ असताना अभिषेक पोरेल बाद झाला. चहलने त्याला १६व्या षटकात बाद केले. तो केवळ नऊ धावाच करू शकला.
हे ही वाचा:
उत्तर प्रदेशातील तुरुंग बनले गुन्हेगारांचे कब्रस्तान
गँगस्टर मुख्तार अन्सारीचा मृत्यू
न्यायपालिकेवर टीका करणाऱ्यांविरोधात ६०० वकिलांनी सरन्यायाधीशांना लिहिले पत्र
जम्मूहून श्रीनगरला जाणारी टॅक्सी दरीत कोसळून १० जणांचा मृत्यू
स्टब्ज आणि अक्षर पटेल निष्प्रभ
ट्रिस्टन स्टब्ज आणि अक्षर पटेल यांनी ५१ धावांची नाबाद भागीदारी केली. स्टब्जने दोन चौकार आणि तीन षटकारांसह ४४ धावा केल्या. तर, अक्षर पटेलने १५ धावा केल्या. राजस्थानसाठी नांद्रे बर्गर आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या. आवेश खान याने एक विकेट घेतली. शेवटच्या षटकात गोलंदाजांनी केवळ चार धावा दिल्या. २०व्या षटकात दिल्लीला १६ धावांची आवश्यकता होती. मात्र स्टब्ज आणि अक्षर विजय मिळवू शकले नाहीत.
राजस्थानची सावध सुरुवात
पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थानच्या संघाची धावसंख्या अवघी नऊ असताना यशस्वी जयस्वाल पाच धावा करून परतला. तर, जोस बटलर केवळ ११ धावा करून व संजू सॅमसन १५ धावा करून बाद झाला. त्यामुळे राजस्थानची अवस्था तीन विकेट गमावून ३६ अशी झाली होती. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रवीचंद्रन अश्विन याने रियान पराग याच्या सोबत चौथ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. अश्विन याने १९ चेंडूंत २९ धावा केल्या. ध्रुव जुरेल याने १२ चेंडूंमध्ये तीन चौकार लगावून २० धावा केल्या. सातव्या क्रमांकावर आलेल्या शिमरोन हेटमायर याने रियान परागच्या साथीने ४३ धावांची भागीदारी केली. हेटमायर या सामन्यात १४ धावा करून नाबाद राहिला. रियान परागच्या तुफान फलंदाजीमुळे राजस्थानची धावसंख्या १८०पार पोहोचली. त्यांनी ४५ चेंडूंत सात चौकार आणि सहा षटकारांसह ८४ धावा केल्या. शिमरोन हेटमायर शेवटच्या षटकात त्याने २५ धावा कुटल्या. परागही नाबाद राहिला. दिल्लीच्या वतीने खलील अहमद, मुकेश कुमार, एनरिच नॉर्खिया, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव एकेक विकेट घेतली.