उकाड्याला कंटाळलेला मुंबईकर पावसाची आतुरतेने वाट पाहत होता. अशातच रविवार रात्रीपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रात्रीपासून पडलेल्या पावसाने मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून रस्ते वाहतूकही धीम्या गतीने सुरू आहे यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सोमवारी दिवसभर मुंबईतील पावसाचा जोर कायम राहणार असून भारतीय हवामान विभागाने (IMD), सोमवार, ८ जुलै रोजी दिवसभर मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. मुंबईत रविवारी रात्री १ ते सोमवारी सकाळपर्यंत ७ वाजेपर्यंत ३०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईला पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातार जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.
शाळांना सुट्टी जाहीर
मुंबईतील सकाळच्या सत्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शाळेत आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना परत पाठवण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. मुंबईकरांना देखील प्रशासनाकडून आव्हान करण्यात आले आहे. गरज नसेल तर बाहेर पडू नका असे आव्हान नागरिकांना करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
‘हाथरसच्या गर्दीत विषारी वायूचे कॅन उघडल्याने लोक गुदमरले’
महुआ मोईत्रांना वक्तव्य भोवणार, एफआयआर दाखल!
‘मलाही विश्वचषक विजेत्यांसारखा सन्मान हवा!..’
आशिया चषकासाठी महिला टीम इंडियाची घोषणा; हरमनप्रीत कौरची कर्णधारपदी निवड
रेल्वे खोळंबली
मध्यरात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबईतील रेल्वेला बसला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर तीनही रेल्वे मार्गांवरील वाहतूक धीम्या गतीने सुरू असून लांब पल्ल्याच्या गाड्या विविध स्थानकांवर अडकून पडल्या आहेत. कोल्हापूर ते मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस अंबरनाथ स्थानकावर अडकून पडली असून पुण्याकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे कर्मचारी पाणी उपसण्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत. कोणताही सिग्नल न मिळालाने एकामागे एक लोकल गाड्या उभ्या आहेत. पावसाचा फटका विमान वाहतुकीला देखील बसला आहे. मुंबईहून इतर ठिकाणी जाणाऱ्या अनेक फ्लाईट रद्द करण्यात आल्यात किंवा त्यांची वेळ पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे विमान प्रवाशांना देखील पावसाची झळ बसली आहे.