मुंबईत पावसाची हजेरी, राज्यात येलो अलर्ट जारी

पुढील दोन दिवस वेगवान वाऱ्यासह पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज

मुंबईत पावसाची हजेरी, राज्यात येलो अलर्ट जारी

अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ वादळामुळे विलंब झालेल्या पावसाने अखेर सोमवार, १२ जून रोजी मुंबईसह पालघर जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. रविवारी मुंबईत तुरळक सारी कोसळल्यानंतर पावसाने सकाळपासून ढगांच्या गडगडाटासह दमदार हजेरी लावली. पावसाच्या हजेरीमुळे नागरिकांना आणि शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे.

सोमवारी सकाळीच मुंबईसह कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, दहिसर, विलेपार्ले या उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत पावसाने हजेरी लावली असली तरी कुठेही पाणी साचलेले नाही. मात्र, सकाळीच पावसाने हजेरी लावल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

दरम्यान, मुंबईत ढगाळ वातावरण असून ‘बिपरजॉय’ या चक्रीवादळाची तीव्रता वाढल्याची माहिती आहे. या चक्रीवादळामुळे समुद्राने रौद्र रूप धारण केले आहे. राज्याला यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

पुढील दोन दिवस वेगवान वाऱ्यासह पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सोबतच राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर संपूर्ण विदर्भात १५ जूनपर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे.

हे ही वाचा:

इंडिगो एअरलाइन्सचे विमान भरकटून पाकिस्तानमध्ये पोहचले

गेमिंग ऍप धर्मांतरण प्रकरणी फरार शाहनवाजला पकडले

सतत रडणे,गप्प गप्प राहणे; ओडिशा अपघातातील जखमी मनोविकाराने ग्रस्त

ऑस्ट्रेलियाने जिंकले पहिले कसोटी अजिंक्यपद

दरम्यान मुंबईतील पावसाच्या आगमनानंतर वांद्रे वरळी सी लिंकच्या खांबांवर लाटा आदळत होत्या. तर, गेट वे ऑफ इंडिया, वरळी आणि मरीन ड्राईव्ह येथेही उंच लाटा पाहायला मिळाल्या.

Exit mobile version