ट्रॉम्बे कुर्ला या एक मार्गी रेल्वेमार्गाला झोपडपट्टीने विळखा घातला आहे. या रेल्वे मार्गाचा वापर ज्वलनशील, स्फोटक आणि धोकादायक पदार्थांच्या वाहतुकीसाठी केला जातो. रेल्वे मार्गाजवळच्या झोपडपट्टीमुळे आसपासच्या परिसराला धोका होऊ शकतो असा मुद्दा कुर्ला पूर्वेतील नेहरू नगर या भागातील रहिवाशांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे मांडला आहे.
जागो नेहरू नगर रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशन यांनी रेल्वे प्रशासनाला पत्र लिहिले आहे. या परिसरातील झोपड्यांची संख्या वाढतच असून काही लोकांनी कोणत्याही कायद्याला न जुमानता आणि परिसरातील इतर रहिवाशांच्या सुरक्षेचा विचार न करता घरावर अजून काही मजले वाढवले आहेत. असे या पत्रात म्हटले आहे. झोपडपट्टीमधील लोक रेल्वेमार्गाचा वापर बसण्यासाठी, लहान मुले खेळण्यासाठी करत असतात. या भागातून जाताना लोकांच्या वावरामुळे मालवाहू रेल्वेचा वेग ताशी दहा किलोमीटर इतका कमी करावा लागतो.
मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार २०१३ मध्ये नेहरू नगर पोलीस ठाणे आणि मुंबई अग्निशमन दलाने याबद्दल मध्य रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली होती. झोपडपट्टीची वाढती संख्या ही त्या परिसरातील एखाद्या मोठ्या अपघाताचे कारण बनू शकते, असे असोसिएशनचे सचिव मिलंद बने यांनी सांगितले.
झोपडपट्टी परिसरात एखादा सिलेंडर स्फोट झाला किंवा शोर्ट सर्किटमुळे आग लागली आणि त्याच वेळी जर असे धोकादायक पदार्थ घेऊन एखादी रेल्वे तिथून जात असेल तर त्या अपघाताचा धोका परिसरातील सुमारे हजार लोकांना असणार आहे अशी भिती असोसिएशनचे अध्यक्ष अभिजीत कुलकर्णी यांनी व्यक्त केली. संपूर्ण प्रकरणाची माहिती करून योग्य पावले उचलली जातील असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.