कोरोनाच्या संकटकाळात रेल्वे स्थानकांवर गर्दी होऊ नये यासाठी वाढविण्यात आलेले दर आता पूर्ववत करण्यात आले आहेत.
रेल्वे फलाटांवर होणाऱ्या नातेवाईकांच्या गर्दीला अटकाव करता यावा यासाठी फलाटाच्या तिकिटाची किंमत १० रुपयांवरून ५० रुपये करण्यात आली होती. पण आता ही रक्कम पूर्ववत म्हणजे पुन्हा १० रुपये करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेने आपल्या पत्रकात हे नमूद केले आहे की, २५ नोव्हेंबरपासून रेल्वे फलटांच्या तिकिटांचे दर हे ५० रुपयांवरून १० रुपये असे पूर्ववत करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल या स्थानकांवर आता हे तिकीट पूर्वीच्या किमतीलाच मिळू शकेल.
कोविड-१९ महामारीच्या काळात रेल्वेने वाढवलेले प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर ही तात्पुरती उपाययोजना असल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करून निष्कारण रेल्वे फलाटांवर येण्यापासून जास्तीत जास्त लोकांना रोखता येऊ शकेल.
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार स्थानकांवरील गर्दी नियंत्रणाच्या उपाययोजना करण्याची जबाबादारी त्या विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकाची असेल असे म्हटले होते.
“ही तात्पुरती उपाययोजना आणि स्थानिक पातळीवरील उपाय आहे. रेल्वे मंत्रालयाकडून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि स्थानकांवर होणारी गर्दी रोखण्यासाठी घेण्यात आलेला खबरदारीचा उपाय आहे.” असे मंत्रालयाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले होते.
हे ही वाचा:
मंदिर तोडले कट्टरवाद्यांनी, दंड भरतोय हिंदू समाज
परमबीर सिंग चंदीगडमध्ये असल्याची माहिती
‘स्वर्गीय सृष्टी सौंदर्याचे आपले पूर्वांचल’ पुस्तकातून दिसतो पूर्व भारताचा नजारा
विलिनीकरण की पगारवाढ; एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर कोणता तोडगा?
“लोकांना स्थानकात येण्यापासून परावृत्त करण्यासाठी प्रत्यक्ष परिस्थितीचा वारंवार आढावा घेऊन वेळोवेळी प्लॅटफॉर्म तिकीटांचे दर बदलते ठेवले आहेत. स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन या दरांत बदल करण्याचे अधिकार विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना देण्यात आले आहेत” असेही या पत्रकात म्हटले होते.