ओडिशाच्या बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत २८८ जण ठार झाले असून ५४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ९००हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बालासोर आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये उपचार सुरू आहेत. हा अपघात हल्लीच्या काही वर्षांतला सर्वांत मोठा अपघात असल्याने केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना विरोधी पक्षांनी लक्ष्य केले आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली आहे.
अश्विनी वैष्णव यांनी या मागणीवर ही वेळ राजकारण करण्याची नाही, असे स्पष्ट केले आहे. ‘आता मदत करण्याची वेळ आहे. आमचे सारे लक्ष बचावमोहिमेवर आहे. संपूर्ण शक्तिनिशी आम्ही काम करत आहोत. मी कुठेही जात नसून इथेच आहे. बचावमोहीम खूप वेगाने सुरू आहे,’ असे वैष्णव यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
दोषींना कठोर शिक्षा होईल, कुणालाही सोडणार नाही!
राऊतांचे राजकारण थुकरट वळणावर!
ओदिशातील अपघाताप्रमाणेच देशात अनेक अपघातांनी उडविली होती झोप
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओदिशात जाऊन घेतला अपघातस्थळाचा आढावा
‘पंतप्रधानांनी दौऱ्यात आवश्यक ते निर्देश दिले आहेत. पंतप्रधानांनी खूप वेगाने काम करण्यास सांगितले आहे. अपघाताच्या चौकशीनंतर आवश्यक ती पावले उचलली जातील. १५ ते २० दिवसांत चौकशीचा अहवाल सादर केला जाईल,’असे त्यांनी सांगितले. ‘कवच’ या स्वयंचलित रेल्वे संरक्षण यंत्रणेच्या अभावामुळे हा अपघात घडला का, याबाबत विचारले असता, चौकशी अहवाल सादर झाल्यावर बरेच काही स्पष्ट होईल, असे त्यांनी नमूद केले.
रेल्वेमंत्र्यांनी त्यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरही उत्तर दिले. ‘ज्या प्रकारचा अपघात झाला आहे, तिथे मानवी संवेदनांचा मुद्दा महत्त्वाचा आहे. मी हेच म्हणेन की, आमचे प्राधान्य बचावमोहिमेवर आहे,’ असे ते म्हणाले. काँग्रेसचे खासदार मणिकम टागोर, तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी, माकपचे खासदार बिनॉय विश्वम, काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार दिग्विजय सिंह, शिवसेना उद्धव गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.