भारताचा शैलीदार फलंदाज राहुल द्रविडची भारतीय संघाचा प्रमुख प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. संयुक्त अरब अमिरातीत सुरू असलेल्या टी-२० वर्ल्डकपनंतर द्रविड भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेईल. दोन वर्षांसाठी हे प्रशिक्षकपद त्याच्याकडे सोपविण्यात येणार आहे. रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर द्रविडकडे ही जबाबदारी येणार आहे.
बीसीसीआयच्या पत्रकाच्या माध्यमातून द्रविडने आपल्या भावना व्यक्त केल्या असून भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून आपल्याला ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे, याचा सार्थ अभिमान आहे. रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने उत्तम वाटचाल केली. तो वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न मी करणार आहे.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत यापैकी अनेक खेळाडूंसह काम केलेले असल्यामुळे मला त्यांची क्रिकेटबद्दलची आस्था ठाऊक आहे. शिवाय, प्रगतीपथावर राहण्याची भूकही त्यांच्यापाशी आहे. पुढील दोन वर्षांत काही महत्त्वाच्या स्पर्धा येऊ घातल्या आहेत. त्यात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांच्या समन्वयातून करणार आहे.
या पदासाठी द्रविडने अधिकृतरित्या अर्ज केल्यानंतर त्याची निवड निश्चित होती. सुलक्षणा नाईक आणि आरपी सिंग यांचा समावेश असलेल्या बीसीसीआयच्या सल्लागार समितीने द्रविडच्या नावावर शिक्कामोर्तब केले. द्रविडचा एकेकाळचा सहकारी आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी द्रविडला ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी प्रवृत्त केले.
बेंगळुरू स्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख या नात्याने द्रविड काम पाहात होता. त्याआधी भारत अ आणि भारताच्या १९ वर्षांखालील मुलांच्या संघाचे प्रशिक्षकपद त्याने भूषविले होते. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताने १९ वर्षांखालील मुलांच्या वर्ल्डकपमध्ये दोनवेळा अंतिम फेरी गाठली. त्यात एकदा भारताने विजेतेपद पटकाविले.
हे ही वाचा:
मोदी सरकारकडून देशवासियांना दिवाळीची भेट
हुश्श!! भारताने आव्हान जिवंत ठेवले; अफगाणिस्तानवर केली मात
आता मला कोणतीही माहिती देण्याची इच्छा नाही
अखेर कोवॅक्सीनला जागतिक मान्यता
रवी शास्त्री यांनी अनिल कुंबळेकडून प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली होती. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरविण्याची कामगिरी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने करून दाखविली होती.
द्रविडसोबत सपोर्ट स्टाफ लवकरच जाहीर कऱण्यात येईल पण गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील पारस म्हांब्रेची निवड त्यासाठी होण्याची शक्यता अधिक आहे. क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी अजय रात्रा आणि अभय शर्मा हे स्पर्धेत आहेत.