२०१८च्या उपविजेत्यांना इंग्लंडकडून धक्का

२०१८च्या  उपविजेत्यांना इंग्लंडकडून धक्का

इंग्लंड क्रोएशिया या सामन्यामधील अधोरेखित करण्यासारखी गोष्ट होती आणि ती म्हणजे इंग्लिश आक्रमण. इंग्लंडच्या स्ट्राईकर्स आणि मिडफिल्डर्सनी सामन्यावर आपली पकड सामना सुरु झाल्यापासूनच मजबूत ठेवली. त्याच आक्रमणच्या जोरावर इंग्लंडने हा सामना १-० असा जिंकून आपल्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणला. इंग्लंडमधील विम्बले स्टेडियममध्ये हा सामना खेळाला गेला त्यामुळे इंग्लंडला घरच्या मैदानावर खेळल्याचा फायदा मिळाला आणि या संधीचे सोने इंग्लंडने केले.

इंग्लंड संघ ऑन पेपर चांगलाच दिसत होता आणि त्या पद्धतीचा खेळ त्यांनी करूनही दाखवला. इंग्लंडच्या अटॅकची जबाबदारी हॅरी केन याच्यावर होती, २०१८ च्या फुटबॉल विश्वचषकात त्याने ६ गोल केले होते आणि गोल्डन बूटचा किताबही पटकवला होता. त्याच्या साथीला रहीम स्टर्लिंग सारखा अनुभवी खेळाडूही होता आणि स्टर्लिंगनेच सामन्याच्या ५७ व्या मिनिटात इंग्लंडला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

क्रोएशियाकडे लुका मॉड्रीच, इवान पेरिसीच आणि क्रॅमेरीच यासारखे अनुभवी खेळाडू होते, ज्यांनी २०१८ च्या विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी केली होती ज्यामुळे क्रोएशिया संघ २०१८ मध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहचला होता पण क्रोएशिया संघातील एक मोठं नाव इवान राकेटीच हा गेल्याच वर्षी आंतराराष्ट्रीय फुटबॉल मधून निवृत्त झाला आणि त्याचं संघात नसणं हे कुठेतरी या मॅच मध्ये जाणवत होतं कारण लुका मॉड्रीच, इवान पेरिसीच, क्रॅमेरीच आणि इवान राकेटीच या चौघांमुळेच २०१८ मध्ये क्रोएशियाचे आक्रमण एवढे धारदार दिसत होते आणि त्याच जोरावर ते विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत पोहचले होते.

ग्रुप डी मध्ये इंग्लंड, क्रोएशिया, स्कॉटलॅंड आणि चेक रिपब्लिक असे देश आहेत, कालच्या सामन्यावरून इंग्लंड हा पुढील सगळे सामने जिंकून उपउपांत्यपूर्व फेरीसाठी सहज पात्र ठरेल असे दिसतं आहे पण ग्रुप डी मध्ये दुसऱ्या नंबर वर कोण असेल यासाठी पुढील सामने बघावे लागतील.

आज स्कॉटलॅंड विरुद्ध चेक रिपब्लिक ( संध्याकाळी ६:३०), पोलॅंड विरुद्ध स्लोव्हाकिया (रात्री ९:३०) आणि स्पेन विरुद्ध स्वीडन (रात्री १२:३०) असे सामने होणार आहेत.

Exit mobile version