भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण होत असून नौदल दिनाच्या निमित्त पंतप्रधान मालवणात सोमवारी दाखल झाले. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे यांनी ‘न्यूज डंका’शी संवाद साधत या कार्यक्रमाचे महत्त्व विषद केले.
रघुजीराजे म्हणाले की, ज्या वेळेला स्वराज्याची स्थापना झाली त्याच्याआधीच्या कालखंडातही महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात अनेक राजसत्ता होत्या पण कोणत्याही राजसत्तेला आरमार असावे असे वाटले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा विचार केला आणि हा क्रांतिकारी निर्णय घेतला. संपूर्ण भारताच्या किनाऱ्यावर कुणाचे अधिपत्य असावे यासाठी युरोपियन भांडत होते. पण महाराष्ट्रातील कुणालाही त्याचा विधिनिषेध नव्हता. जमीन जर आमची तर समुद्रही आमचा ही छत्रपती शिवाजी महाराजांची अपेक्षा होती आणि ती त्यांनी लोकांच्या मनात निर्माण केली.
मालवणमध्ये नौदलदिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले, याबद्दल रघुजीराजे म्हणाले की, ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे. यापूर्वी स्वतंत्र भारतात अनेक सरकारे आली, पण महाराष्ट्राबद्दल किंवा महाराष्ट्राच्या परंपरेबद्दल विचार करणारे क्रांतिकारी शासन आता आले आहे, ज्यांनी शिवाजी महाराजांचा अशापद्धतीने गौरव केला. रायगडच्या विकासासाठी ज्यांनी सहाय्य केले. मालवण हे पर्यटन स्थळ आहेच, सागरी किनारा आहे पण त्याचा योग्य पद्धतीने गौरव करणे हे शासनाला वाटते, ही खास बाब आहे. यानिमित्ताने विशाखापट्टणम येथे आयएनएस मालवण या विनाशिकेचे जलावतरण करण्यात आले. आता ही बोट जिथे कुठे जाईल तिथे मालवणचे नाव जाईल. संपूर्ण कोकणाकरिता ही गौरवास्पद बाब आहे.
रघुजीराजेंनी सांगितले की, महाराष्ट्रातल्या तरुण पिढीने याचा आदर्श घेतला पाहिजे. महाराष्ट्राला ७२० किमीची किनारपट्टी आहे. पण दुर्दैवाने महाराष्ट्रातून नौदलात जाणाऱ्या तरुणांचे प्रमाण कमी आहे. उत्तराखंड, बिहारचे तरुण नौदलात जातात. आपल्या तरुणांनी अंतर्मुख होऊन कारकीर्द घडविण्यासाठी या संधीकडे पाहिले पाहिजे. मात्र या कार्यक्रमातून जागरुकता निर्माण होईल. नौदलात आपली कारकीर्द घडविण्यासाठी या कार्यक्रमातून काही धडा महाराष्ट्रातील तरुण घेऊ शकतील, असे वाटते.
स्वतः या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले रघुजीराजे म्हणाले की, या कार्यक्रमामुळे मालवणात बऱ्यापैकी भारावलेले वातावरण आहे. सागरी किल्ले हे आपल्या अस्मितांचे मानबिंदू आहेत. १५-१६व्या शतकांत निर्माण केलेले अनेक किल्ले पश्चिम किनारपट्टीवर आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने आपली एक साधनसंपत्ती म्हणून त्याकडे पाहता येईल. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग असे अनेक किल्ले आपल्याकडे आहेत. त्यांच्याकडे लक्ष दिले तर रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात.
हे ही वाचा:
काँग्रेसच्या पराभवानंतर इंडिया आघाडीवर अखिलेश सिंह यांचा वरचष्मा?
२०२४ ला देवेंद्र फडणवीसचं मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील
परदेशांतील प्रसारमाध्यमांकडूनही मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक
सिलक्यारा बोगद्याचे काम याच महिन्यात होणार सुरू!
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार असल्यामुळे तिथे काही दिवस पर्यटन सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आले. त्याबद्दल रघुजीराजे म्हणाले की, कुठल्य़ाही प्रकारच्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती कार्यक्रमाला येतात तेव्हा पर्यटन थांबणार हे स्वाभाविक आहे. पण याचे भविष्यातील फायदे आपण पाहिले पाहिजेत. आज आंतरराष्ट्रीय नकाशावर सिंधुदुर्गची चर्चा होत आहे. चार दिवस पर्यटन बंद राहणार यापेक्षा पुढील ४० वर्षात सिंधुदुर्गची प्रगती होणार आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. काहीवेळा तात्कालिक समस्या वाटते पण पण नंतरच्या काळातील त्याचे परिणाम वेगळे असतात. पर्यटनाच्या दृष्टीने, रोजगाराच्या दृष्टीने अनेक संधी मालवणात मिळू शकतील.
रघुजीराजे म्हणाले की, कान्होजी आंग्रेंचा वंशज म्हणूनच नाही तर दुर्गसंवर्धनाच्या क्षेत्रात, इतिहासाच्या क्षेत्रात मी कार्यरत आहे. मला एक गोष्ट जाणवते की, महाराष्ट्रातील तरुण पिढीला आपल्या इतिहासाबद्दल, मानबिंदूंबद्दल आदर आहे. गेल्या काही वर्षात तो वाढला आहे. आपण सकारात्मक पावले उचलली पाहिजेत. सध्या पर्यटन वाढत आहे. सोशल मीडियातूनही पर्यटनाला प्रोत्साहन मिळते आहे. पर्यटन वाढू लागते त्यावेळी स्थानिकांचे स्थलांतर थांबते. कोकणातून मुंबई, कोल्हापूर, पुणे येथे जाणारे लोक कमी झाले आहेत. इथे पर्यटन वाढले आहे. पण खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आज जर शिडाच्या बोटींच्या स्पर्धांसाठी लोक केरळला जातात तर एवढा मोठा किनारा लाभलेला असताना महाराष्ट्रात अशा स्पर्धा का होत नाहीत, असा प्रश्न निर्माण होतो. यासाठी मी महाराष्ट्र शासनाशी संपर्क केलेला आहे.