सुमारे २०० वर्षांच्या ब्रिटिश राजवटीतून देशाला मुक्त करण्यासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान . काहींना फाशी तर काहींना जन्मठेपेची शिक्षा झाली. अनेकांना काळ्या पाण्यासारखी भयानक शिक्षा तर कोणाला कोलूचा बैल बनवले गेले. पण देशाचे शूर सुपुत्र इंग्रजांच्या राजवटीपुढे कधीच झुकले नाहीत. या सगळ्यांमध्ये स्वातंत्र्य सैनिक रासबिहारी बोस यांना विसरून कसे चालेल.ज्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव करून आझाद हिंद फौजेची कमान सुभाषचंद्र बोस यांच्याकडे सोपवली. रास बिहारी बोस यांच्या पुण्यतिथी निमीत्त त्यांच्या जीवनातील काही पैलूवर टाकलेला प्रकाश .
रासबिहारी बोस यांचा जन्म २५ मे १८८६ रोजी बंगालच्या वर्धमान जिल्ह्यातील सुभलदा गावात झाला. त्यांनी चंदनगर येथून शिक्षण घेतले. भारताचा स्वातंत्र्यलढा, गदर चळवळ आणि आझाद हिंद फौजेची निर्मिती यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शालेय जीवनापासूनच ते क्रांतिकारी कार्याकडे आकर्षित झाले होते. बंकिमचंद्र यांच्या आनंद मठ या कादंबरीतून त्यांच्यात क्रांतीचा आत्मा जन्माला आला. याशिवाय स्वामी विवेकानंद आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या राष्ट्रवादी भाषणांमुळे त्यांच्या आत क्रांतीची ज्योत अधिक वेगाने धगधगू लागली. बंगालच्या फाळणीनंतर तर रासबिहारी यांचा इंग्रज विरोध अधिक आक्रमक झाला. त्यानंतर त्यांनी इंग्रजांविरुद्धच्या कारवायांमध्ये पूर्णपणे स्वतःला झोकून दिले.
स्वातंत्र्य मिळवण्याची आस मनात इतकी होती की रासबिहारी बोस आपला उद्देश कधीच विसरले नाहीत. १९१४-१९१५ मध्ये अमेरिका आणि कॅनडामध्ये राहणाऱ्या पंजाबींनी गदर पार्टीची स्थापना केली होती. पक्ष स्थापनेचा उद्देश भारताला स्वतंत्र करणे हा होता. १९१४ मध्ये अमेरिकेत आणि कॅनडात स्थायिक झालेले भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यासाठी भारतात येऊ लागले. ते त्यांच्यासोबत दारूगोळाही आणत होते. या गदर चळवळीची कमान रासबिहारी बोस यांच्याकडे सोपवण्यात आली. बोस यांनी फेब्रुवारी १९१५ रोजी ब्रिटीश अधिकाऱ्यांविरुद्ध उठाव करण्याची योजना आखली. मात्र, काही हेरगिरीमुळे इंग्रजांना या योजनेचा सुगावा लागला आणि ही योजना तडीस जाऊ शकली नाही.यानंतर इंग्रजांनी शेकडो क्रांतिकारकांची निर्दयीपणे हत्या केली.
बॉम्बस्फोटाने ब्रिटिश राजवट हादरली
१९१२ मध्ये रासबिहारी यांच्या नेतृत्वाखालील क्रांतिकारकांनी भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंज यांना मारण्याची योजना आखली. बोस अभ्यासादरम्यान बॉम्ब बनवायला शिकले होते. डिसेंबर १९१२ मध्ये राजधानी स्थलांतराच्या निमित्ताने नवी दिल्ली येथे ब्रिटिशांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बोस त्यांचे सहकारी बसंत कुमार बिस्वास यांच्यासह कार्यक्रमाला उपस्थित होते. बिस्वास यांनी लॉर्ड हार्डिंग यांच्यावर बॉम्ब फेकला. हार्डिंग बॉम्बने जखमी झाले पण मरण पावले नाहीत. व्हाईसरॉयच्या हत्येची योजना अयशस्वी झाली असली तरी ब्रिटिश राजवट हादरली. ब्रिटीश सरकारने क्रांतिकारकांना रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. मात्र यावेळीही रासबिहारी पळून जाण्यात यशस्वी झाले.
सुभाषचंद्र बोस यांच्याकडे सोपवली आझाद हिंद फौजेची कमान
२८ मार्च १९४२ रोजी टोकियो येथे झालेल्या परिषदेनंतर इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही दिवसांनी सुभाषचंद्र बोस यांना अध्यक्ष करण्याचे ठरले. मलाया आणि ब्रह्मदेशात जपान्यांनी पकडलेल्या भारतीय कैद्यांना इंडियन इंडिपेंडन्स लीग आणि इंडियन नॅशनल आर्मीमध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. १ सप्टेंबर १९४२ रोजी कॅप्टन मोहन सिंग आणि सरदार प्रीतम सिंग यांच्यासह रासबिहारी यांच्या प्रयत्नाने भारतीय राष्ट्रीय सेना अस्तित्वात आली. त्याला आझाद हिंद फौज असेही म्हणतात.महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्यातील मतभेदाच्या वेळी रासबिहारी यांनी आझाद हिंद फौजेची कमान सुभाषचंद्र बोस यांच्याकडे सोपवली .
जपान सरकारने दिला सर्वोच्च सन्मान
दुसरे महायुद्ध संपण्यापूर्वी २१ जानेवारी १९४५ रोजी रासबिहारी बोस यांचे टोकियो येथे निधन झाले. जपान सरकारने त्यांना दुसरा ऑर्डर ऑफ मेरिट ऑफ द रायझिंग सन दिला – परदेशी व्यक्तीला दिलेला सर्वोच्च पुरस्कार. पण त्याहूनही हृदयस्पर्शी म्हणजे जपानच्या सम्राटाने त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना दिलेला सन्मान. भारतीय ज्येष्ठ क्रांतिकारकाचे पार्थिव वाहून नेण्यासाठी इम्पीरियल कोच पाठवण्यात आले होते. परंतु, स्वतंत्र भारतात या महान देशभक्ताचा अस्थिकलश मातृभूमीला परत आणण्यातही अपयश आले.